नाशिकरांच्या गौरवाचा ठेवा “चित्रघंटा टेक”

नाशिकनगरीला पूर्वी एकूण १४ दरवाजे होते व वस्ती नऊ टेकांवर वसलेली होती. शहरात नऊ दुर्गांची अधिष्ठाने होती. या सर्व जुन्या नाशिक नगरीच्या रचनेतील चित्रघंटा टेकभोवताली नाव दरवाजा व दिल्ली दरवाजा ही महत्त्वाची प्रवेशद्वारे व नऊ दुर्गांपैकी एक देवी असा त्रिवेणी महिमा असलेला हा विभाग आहे.

प्राचीन काळी नदीकाठी वस्ती होती. तथापि, पावसाळ्यात नदीला येणार्‍या पुरामुळे टेकडीवरील उंच जागेचा आश्रय घ्यावा लागत असे. परिणामी, कायमस्वरूपी घरे बांधली गेली. कालांतराने भव्य वाड्यात पुनर्रचना झाली. गोदावरीचा दक्षिण वाहिनी प्रवाह जेथून पूर्वेकडे प्रवाहित होतो, त्या वळणावरील विभाग म्हणजे चित्रघंटा टेक. चित्रघंटा टेकडीच्या संरक्षणार्थ नदीपात्रालगत नावदरवाजा व दिल्ली दरवाजादरम्यान बांधण्यात आलेला दगडी कोट, चित्रघंटा कोट व अलीकडे रोकडोबा कोट या नावाने ओळखला जातो. या परिसरात श्री मंगळादेवी मंदिर, मंगळ ग्रह देवता मंदिर, बळे यांचे खंडोबा व दत्तमंदीर, बायकांचा राम, गोपाळकृष्ण ही श्रध्दास्थानी असलेली महत्त्वाची मंदिरे आहेत.

चित्रघंटा टेकच्या सुरुवातीला उपरोक्त दोन्ही दरवाजांच्या मध्यास (रोकडोबा मंदिरालगत) मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मेघतीर्थ व कोटितीर्थ अशी दोन स्थाने शिवालयासमोर आहेत. या शिवालयात मध्यरात्री स्पष्ट स्वरूपात मंत्रोच्चार व प्रार्थनेचा कुणीतरी साधु पुरूषाचा आवाज ऐकू येत असे. त्यामुळे त्या टेकावर भयग्रस्त वातावरण असे. शेजारीच चांदवडकर यांची धर्मशाळा, लगत काही समाध्यादेखील बांधण्यात आल्या आहेत. १७८२ मध्ये मुक्तेश्वर मंदिरापासून नदीपात्र ते चित्रघंटा कोटावर जाण्यासाठी गणपतराव रामचंद्र दीक्षित यांनी दगडी पायर्‍या बांधून दिल्या. चैत्रशुद्ध एकादशीला निघणार्‍या रामरथाबरोबरच गरूडरथाचे आगमन गणेशवाडीतून गोदापात्राच्या वाळवंटात होत असे. भाविकांच्या दर्शनार्थ शहरातून रथ नेण्याची प्रथा सुरू झाली तेव्हा गोदापात्रातील पूर्वेकडून पश्चिमेकडे शहरात प्रवेश करताना गरूडाचा रथ प्रथमत: मुक्तेश्वरापासूनच प्रवेश करतो. ही प्रथा आजही कायम आहे.

नाव दरवाजाकडे प्रवेश करताना असलेल्या हनुमानाला टोकड्या हनुमान असे संबोधत असत. भक्तांची मनोकामना तात्काळ पूर्ण करणारी देवता म्हणून रोकडोबा हनुमान या नावाने ओळखले जाऊ लागले. ब्रिटीश राजसत्ता उलथून टाकण्यासाठी १८५७ मध्ये जी चळवळ सुरू झाली, त्यात वीर सावरकरांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या अभिनव भारत मंदिराच्या चळवळीचे योगदान महत्त्वाचे आहे. तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यवीर तात्यासाहेब सावरकरांनी गावात ठिकठिकाणी सभा आयोजित करून सशस्त्र क्रांती युद्धाची प्रेरणा दिली. त्यात मुख्यत्वे गावातील तालमीसमोर त्यांनी दिलेल्या व्याख्यानांपैकी रोकडोबा तालमीसमोर २१ एप्रिल १९०६ ला दिलेले व्याख्यान अतिशय तेजस्वी विचारांनी मंत्रमूग्ध करणारे होते.

जॅक्सन वधासाठी या विभागातील अनेक तरूणांनी प्रेरणा घेतली हा इतिहास सर्वश्रुत आहे. मुस्लिम राज्य संपुष्टात आले. त्यांच्या राजवटीत बांधण्यात आलेल्या नाव दरवाजा व तिवंध्याचे महाव्दार यांचे अवशेषही जमीनदोस्त झाले. तथापि, ते महाद्वार म्हणजे चित्रघंटा, टेकडी रस्ता व तिवंध्याकडे जाणारा रस्ता या दरवाजावर ते महाद्वार आहे. ते म्हणजे औरंगाबादकरांचा वाडा. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाडा चौकांचा प्रशस्त, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त सागवानी लाकूड व भिंतीसाठी गवत व मातीची भरभक्कम दोन-दोन, तीन-तीन थरांचे बांधकाम असलेल्या तीन फूट भिंतीत देवघर, वाड्यात आड आणि मुख्यत्वे तांब्याचे पाईप, घरामधील भुयार, वाड्याच्या मध्यभागी औदुंबर किंवा पिंपळवृक्ष अशा तर्‍हेने हवा व वायुविजन याची दक्षता अशी वैशिष्ट्ये असलेला हा वाडा आहे. हा वाडा म्हणजे महाद्वार अशासाठी की, नाशिकची सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक व विशेषत: ग्रंथालय क्षेत्रातील नाशिकची धुरा सांभाळणारे एक दिग्गज अण्णासाहेब मु. शं. औरंगाबादकर हे प्रारंभी आपल्या परिवारासह सोमवार पेठेत राहत असत. प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे वडील शंकरराव आणि काका गोविंदराव यांनी कष्टप्रद प्रवास सुरू ठेवला. किराणा दुकानात मजुरी करत विविध अनुभवांतून त्यांनी गंगाघाटावर स्वत:चे दुकान थाटले.

नाशिक परिसरातील अनेक गावांतून भरणार्‍या बाजारासाठी बैलगाडीमधून किराणा वस्तू नेऊन विक्रीचा व्यवसाय सुरू केला. दोघेही व्यायामप्रेमी रोकडोबा तालमीचे आधारस्तंभ होते. त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. गोविंद हरी व चिंतामण शंकर औरंगाबादकर या महाराष्ट्राच्या व्यापारी जगात दोन पिढ्या ख्यातकीर्त आहेत. धंद्यात धर्म ठेवला, धर्माचा धंदा केला नाही. अण्णांचे काका व वडील सिंहस्थ काळात गरिबांच्या लग्नसमारंभासाठी किराणा उधारीने देत असत. त्यांचे हफ्ते म्हणजे पुढील सिंहस्थाच्या (१२ वर्षांचा) कालावधी ही घेणार्‍यांची नव्हे तर देणार्‍यांची म्हणजे औरंगाबादकरांची अट असे. फुकटचे कोणी घेऊ नये यासाठी उधारीची पत; परंतु त्यातूनही जो देईल त्याचे भले न देईल त्याचेही भले हा विचार, हीच परंपरा त्यांच्या कर्तृत्ववान सुपुत्रांनी चिंतामणराव आणि मुरलीधरराव यांनी पुढे चालविली. नाशिकनगरीला महाराष्ट्राचे सांस्कृतिक विद्यापीठ अशी महत्ता प्राप्त करून देणार्‍या संस्थांमध्ये सार्वजनिक वाचनालय, लोकहितवादी मंडळ, मर्चंट बँक, गुलालवाडी व्यायामशाळा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान या संस्था प्रामुख्याने आहेत.

चित्रघंटा टेकावर जाताना बायकांचे राम हे प्रसिद्ध मंदिर त्याच्या शेजारील वाड्यात प्रसिद्ध रामभक्त खोत गुरुजी यांचे वास्तव्य होते. याच टेकावर पूर्वी तमाशात काम करणार्‍या दिडेकरीण या कलावती राहत. कोटालगत अंघटकर, गायधनी त्याचप्रमाणे पेशव्यांचे मामा डुबेरकरांचाही प्रसिद्ध वाडा आहे. महसूल विभागातील अधिकारी तसेच कवयित्री-कवी मंडळाच्या संस्थापक सदस्या मोराणकर यांचा वाडा आहे. नाशिक शहराला भूषणावह असलेल्या कर्तृत्वाची मखर असलेली चित्रघंटा टेकडी व परिसर नाशिकच्या गौरवाचा ठेवा आहे.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)