बुलेटच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाने नागरिक हैराण

इंदिरानगर : पाथर्डी फाटा, नरहरी नगर येथे अनेक दिवसांपासून एका बुलेटस्वाराची स्टंटबाजी सुरू आहे. त्याने सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांचा आवाज येणारी फायरिंग लावल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले असून, लहान मुलांमध्ये या आवाजामुळे भीती निर्माण झाली आहे.

बुलेटस्वार नरहरी नगरमध्ये अंजना लॉन्सकडून म्हाडा कॉलनी रस्त्याकडे जाताना वेगात जाताना सायलेन्सरमधून फटाक्यांचा मोठा आवाज येईल, अशा पद्धतीने स्टंट करतो. त्यामुळे मुलांमधे भीती निर्माण झाली आहे. शिवाय, परिसरातील ज्येेष्ठ नागरिक व महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या बेशिस्त बुलेटस्वारावर इंदिरानगर पोलिसांनी कायमची कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

स्टंटबाजीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

नरहरी नगरमधील एका महाविद्यालयाबाहेर अनेक युवक सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्याने आवाज होईल, अशा पद्धतीने सुसाट दुचाकी चालवतात. त्यांच्या दुचाकींना नंबर प्लेट नाहीत. या सर्व प्रकाराकडे इंदिरानगर नगर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.