घरमहाराष्ट्रनाशिक'स्मार्ट रोड'ची दिरंगाई नागरिकांच्या जीवावर

‘स्मार्ट रोड’ची दिरंगाई नागरिकांच्या जीवावर

Subscribe

महापालिकेच्या नियोजनाचे तीन तेरा, एका बाजूचे काम होण्यापूर्वीच, दुसरी बाजूही खड्ड्यात

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून मेहेर सिग्नलपर्यंत सर्वाधिक वर्दळीच्या आणि मध्यवर्ती भागातील स्मार्ट रोडचे काम वर्षभरानंतरही अपूर्णावस्थेत असतानाच, महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचेही काम हाती घेतले आहे. पोलिसांनी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत महापालिकेने मनमानी सुरू ठेवत जिल्हाधिकारी कार्यालय ते मेहेर सिग्नलदरम्यानचा रस्ता खोदून ठेवला आहे. परिणामी पादचार्‍यांसह विद्यार्थी, जिल्हाभरातून येणारे नागरीक आणि वाहनधारकांनाम जीव मुठीत घेऊन वाटचाल करावी लागते आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महापालिकेने स्मार्ट रोडसाठी अशोक स्तंभ ते गडकरी चौकादरम्यानच्या रस्त्याची निवड केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात अशोक स्तंभ ते सीबीएसदरम्यानच्या रस्त्याच्या एका बाजूचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. परिणामी काम पूर्ण करण्याची मुदतही निघून गेली आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. सध्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी, पर्यायी रस्त्यांच्या वापरामुळे वाढलेले अंतर, पार्किंगची समस्या अशा विविध प्रश्नांनी नाशिककर पुरते बेजार झाले आहेत. त्यातच आता महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचेही काम हाती घेतल्याने महसूल, न्यायालयाच्या कक्षेतील विविध कामांसाठी शहरासह जिल्हाभरातून या ठिकाणी येणार्‍या नागरिकांपुढील समस्या आणखी तीव्र बनली आहे. हे काम नक्की कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्याच्या कामामुळे दूरवर वाहने पार्क करुन पायपीट करत आलेल्या नागरिकांना खोदलेल्या रस्ता आणि रस्त्यावरील वाहनांमुळे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

- Advertisement -

अडचणींमध्ये अतिक्रमणांचीही भर

महापालिकेने पोलिसांच्या मदतीने अनेकदा कारवाई करूनही या रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न आजही कायम आहे. एकेरी रस्त्यालगतची एक बाजू खोदलेली असतानाही, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत उसाचा रस, जडीबुटी, वडापाव, अशा विविध विक्रेत्यांनी ठाण मांडलेले आहे. त्यामुळे रस्त्याचा एक पदर वाहतुकीसाठी, दुसर्‍या भागात रस्त्याचे काम आणि चारी खोदलेली आहे, असे दिव्य पार करून पादचार्‍यांना मार्गक्रमण करावे लागते. महापालिकेने निदान या प्रश्नाकडे तरी गांभीर्याने लक्ष देऊन निदान पादचार्‍यांसाठी तरी सुरक्षित वाट निर्धारित करून देण्याची गरज आहे.

वाहनांची पार्किंग सुरूच

स्मार्ट रोडच्या कामामुळे पोलिसांनी अधिसूचना काढून या रस्त्यावर वाहनांसाठी पार्किंग अथवा थांबण्यासाठीही बंदी घातली आहे. मात्र, तरीदेखील या रस्त्यावर मोठ्या गाड्या आणि दुचाकीदेखील सर्रास उभ्या केल्या जातात. त्यामुळे कोंडीतही भर पडते. याशिवाय विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनांचा प्रश्न आजही कायम आहे.

- Advertisement -

नाशिककर म्हणतात…

एवढ्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न करू शकलेल्या ठेकेदाराला महापालिकेने दंड करावा. जेणेकरून पुढील दिरंगाई तरी टळू शकेल. याच रस्त्यावर कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सीबीएससारखी महत्त्वाची ठिकाणे असल्याने सतत वर्दळ सुरू असते, हे तरी पालिकेने लक्षात घ्यावे. – विशाल भामरे, विद्यार्थी

स्मार्ट सिटीची कामे ही नियोजनबद्धरित्या पूर्ण होणे अपेक्षित आहे. एक बाजू पूर्ण झाल्यानंतरच दुसर्‍या बाजूचे काम हाती घेणे अपेक्षित होते. एकेरी वाहतुकीमुळे मोठा फेरा मारून प्रशासकीय कामांसाठी येथे यावे लागते. त्यातच वाहन पार्किंगला जागा नाही. अन्यत्र पार्क केले की, पोलीस टपलेलेच असतात. चूक प्रशासनाची असली तरीही भूर्दंड मात्र नागरिकांनाच बसतो. – उमेश खैरनार

महापालिकेच्या कामांची कुप्रसिद्धी खूप झालेली आहे. अनेक प्रकल्पांप्रमाणेच आता स्मार्ट रोडच्या कामांचीही गती मंदावली आहे. या ठिकाणची परिस्थिती माहीत असूनही, त्याकडे सोयीसोयीने डोळेझाक करणार्‍या पालिकेचा हा निष्काळजीपणाचा कळस म्हणावा लागेल. – तुषार निकम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -