घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री उद्या नाशिक दौर्‍यावर येण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्या नाशिक दौर्‍यावर येण्याची शक्यता

Subscribe

कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

जिल्हयात कोरोनाचे संकट कायम आहे. दिवसेंदिवस शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर वाढत असून या एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे गुरूवार (दि.६) रोजी नाशिक दौरयावर येणार असल्याचे समजते. या पार्श्वभुमीवर प्रशासकिय तयारीला वेग आला आहे.

मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढतो आहे. जिल्हयातील कोरोना बाधितांची संख्या १७ हजारांवर जाउन पोहचली आहे तर नाशिक शहरात ११ हजार ५६५ कोरोना बाधित आढळून आले आहेत. एरव्ही नाशिकमध्ये दररोज सुमारे पाचशे रूग्ण आढळून येत होते परंतु आता दररोज १ हजार रूग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात प्रशासनाकडून रूग्णांच्या उपचारासाठी सर्व वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जात असले तरी, रूग्णांना उपचार मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारींवरून हे सर्व कागदावरच असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरीकांमध्ये यंत्रणेविषयीही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे तज्ञ समितीमार्फत नाशिकमध्ये येउन आढावा घेतील असे काही दिवसांपूर्वी जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक दौर्‍यावर येत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पवार यांनी देखील मुख्यमंत्री लवकरच नाशिकला भेट देतील असे सांगितले होते. कोरोनाच्या संकटात राज्याचे मुख्यमंत्री हे मातोश्रीची पायरी ओलांडत नसल्याचा आरोपही भाजपने केला. तर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांनीही मुख्यमंत्री फिरत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवडयात पुणे येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता ते नाशिक येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. याबाबत प्रशासनाला अद्याप अधिकृत दौरा प्राप्त झाला नसला तरी, मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर प्रशासकिय स्तरावर तयारीला वेग आला आहे. या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटरचे उदघाटन होण्याचीही शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ते बैठकही घेणार असल्याने या बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पाउस सुरू असल्याने अद्याप अधिकृत दौरा प्राप्त झालेला नाही सायंकाळपर्यंत हा दौरा प्राप्त होईल असे सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -