घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांवर आता वायू प्रदूषणाचे संकट

नाशिककरांवर आता वायू प्रदूषणाचे संकट

Subscribe

हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी शहरात केवळ एकच केंद्र, किमान २१ केंद्रांची गरज

स्वच्छ आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकवर आता वायूप्रदूषणाचे संकट निर्माण झाले आहे. उद्योगांमुळे निर्माण होणारा धूर आणि वीजनिर्मिती केंद्रांतून बाहेर पडणारे धूलिकण यामुळे सर्वाधिक प्रदूषण होते आहे. राष्ट्रीय मानकांनुसार शहरात किमान २१ हवा तपासणी केंद्रांची गरज असताना प्रत्यक्षात मात्र केवळ एकाच केंद्रावर प्रदूषणाची आकडेवारी काढली जात असल्याची धक्कादायक बाबही पुढे आली आहे.

राष्ट्रीय सेवा दल, मानव उत्थान मंच आणि वातावरण फाऊंडेशन यांच्या वतीने शहरातील पर्यावरण अभ्यासक, संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नाशिकची हवा विषारी करणाऱ्या घटकांची माहिती जाणून घेत त्यावर चर्चा व्हावी, हा चर्चासत्राचा हेतू होता. हवेच्या गुणवत्तेवर संशोधन करणारे अर्बन एमिशन्सचे संस्थापक सरथ गुट्टीकुंडा, मानव उत्थान मंचचे जगबीर सिंह, राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन मते, वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट, राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन मते, ए.सी.पी.एम. मेडिकल कॉलेजच्या प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी आदींनी चर्चासत्रात सहभाग घेतला होता. वायूप्रदूषणाला कारणीभूत स्त्रोतांकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०३० पर्यंत प्रदूषणाची पातळी धोकादायक पद्धतीने वाढेल, असा इशारा गुट्टीकुंडा यांनी दिला. नाशिककरांनीही पुढाकार घेऊन हवेच्या गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांची मागणी करावी. जेणेकरुन आपण जो श्वास घेतो आहोत, त्यात किती प्रमाणात शुद्ध हवा आहे, हे लक्षात येईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हवेतील प्रदूषित सूक्ष्म कण शरीराच्या संरक्षण यंत्रणेला भेदून रक्तप्रवाहाच्या मार्गाने फुफ्फुस व मेंदूसह इतर अवयवात प्रवेश करतात व त्यांच्यावर वाईट परिणाम करतात. वायू प्रदूषणाचा प्रभाव प्रत्येक अवयवावर संथगतीने होत असतो. प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसांची क्षमता ६० ते ७० टक्क्यांनी कमी होऊ शकते आणि कोरोनासारख्या आजारात अशा व्यक्तींना अधिक धोका संभवतो, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली. मुंबई-पुण्यात ज्या पद्धतीने प्रदूषणाविरोधात नागरिक संघटित प्रयत्न करत आहेत, तसेच नाशिककरांनी पुढे यावे. पुढील पिढ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी कृतीशील गट आणि दबाव गट तयार करावेत, असे मत भगवान केसभट यांनी व्यक्त केले.

ऑनलाईन चर्चासत्राचे सूत्रसंचालन नितीन मते यांनी केले. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत ’झटका’चे रोशन केदार, चंद्रकिशोर पाटील, भारती जाधव, छात्र भारतीचे उपाध्यक्ष समाधान बागूल, बुवा शिक्षण संस्थेचे सचिव अमित खरे आदी यात सहभागी झाले होते.

- Advertisement -

वायू प्रदूषणातही नाशिक आघाडीवर

नाशिक शहर टेकड्यांनी वेढलेले आणि भरपूर हिरवाई असल्याने प्रदूषणाची समस्याच नाही, असे वरवर दिसत असले तरीही प्रत्यक्षात मात्र वायूप्रदूषणाची स्थिती बिकट आहे. २०१८ मध्ये नाशिक हे राज्यातले सहावे सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे जाहीर झाले, तेव्हा धोक्याची घंटा वाजली होती. मात्र, एवढे होऊनही दुर्दैवाने कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना झाली नाही. खुद्द नाशिककरदेखील याबाबत फारसे गंभीर नसल्याचे जगबिर सिंग यांनी सांगितले.

केंद्राने दिलेले २० कोटी गेले कुठे?

केंद्र सरकारने नाशिक शहरातील वायू प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढून स्वच्छ हवेचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी शहराला २० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र, हा निधी कुठे आणि कसा खर्च होतो आहे, याबाबत आम्ही अनभिज्ञ असल्याचे सांगत जगबिर सिंग यांनी सरकारी यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संबंधित अधिकार्‍यांनी नाशिकच्या स्वच्छ हवा कृती कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आणि खर्चाची तरतूद यासंदर्भात नागरिकांना माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -