घरमहाराष्ट्रनाशिकमोराचा मृत्यू; वनविभागावर थेट गुन्हा का दाखल करू नये?

मोराचा मृत्यू; वनविभागावर थेट गुन्हा का दाखल करू नये?

Subscribe

निष्काळजीपणामुळे मोराचा मृत्यू लोकमान्यनगरला कुत्र्याने केले जखमी; वनकर्मचारी वेळेत पोहचलेच नाहीत

गंगापूररोडवरील लोकमान्य नगरजवळील उद्यानाजवळ एका जागरूक नागरिकाने मोराला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले; परंतु पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याने मोरावर तातडीने उपचार होण्यासाठी वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, अधिकार्‍यांनी बराच वेळ फोन उचलला नाही. पक्षीमित्र येईपर्यंत मोराचा जीव गेलेला होता. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळेच मोराचा जीव गेल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला. भर उन्हात घोटभर पाण्याच्या शोधात भरकटलेल्या मोराला वेळेवर उपचार न देऊ शकलेल्या वन विभागावर थेट गुन्हा दाखल का करू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गंगापूर रोडवरील रहिवासी विजय धुमाळ यांना मोराचा जीव कुत्र्यामुळे धोक्यात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी धावत जाऊन कुत्र्याच्या तावडीतूनमोराला सोडवले आणि उपचारासाठी अशोक स्तंभ परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. दवाखाना बंद असल्याने त्यांनी सरळ आमदार देवयानी फरांदे यांचे घर गाठले. एक तासापासून मोर अत्यवस्थ होता. आमदार फरांदेंनी ताबडतोब ही माहिती वन विभागाला कळवली. मोर हा सूची एक मधील पक्षी असल्याने कोणालाही तो जवळ ठेवता येत नाही. त्यामुळे वन विभागाची वाट पाहणे इतकेच शिल्लक राहिले. या दरम्यान अनेक फोन वन विभागाला केले गेले. मात्र, अधिकारी फोनच उचलायला तयार होत नव्हते. दुसरीकडे मोर धापा टाकत होता. त्याला वैद्यकीय उपचाराची अत्यंत आवश्यकता होती. या दरम्यान वन्य प्राण्यांवर काम करणार्‍या एका संस्थेचे कार्यकर्ते येथे आले. माहिती देऊनही एक तासानंतर वन विभागाची गाडी आमदार फरांदेंच्या घराजवळ पोहोचली. तोपर्यंत मोराचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

नाशकात हवे रेस्क्यू सेंटर

शहराचे तापमान चाळीशी पार होत असताना पाण्यासाठी वन्यप्राणी, मोर शहराकडे येऊ लागले आहेत. त्यांना संरक्षण देता आले नाही, तर त्यांचा किंवा माणसाचा जीव जाण्याची शक्यता असते. वन विभागाचे रेस्क्यू सेंटर नाशिकला व्हावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

वनविभागाची गरज काय?

वन विभागाने केली पाहिजे ती कामे कोणताही अधिकार नसताना वन्य प्रेमी मित्रांना करायला लावत असल्याचे चित्र नाशिक विभागात बघावयास मिळत आहे. कुठेही साप निघो, की वन्य प्राणी, वन विभाग पोहोचण्याआधी वन्य प्राणीमित्र पोहचलेले असतात. मग वन विभागाची गरजच काय, असा प्रश्न नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी उपस्थित केला आहे. वन विभागाने उन्हाळ्यात सतर्क राहणे आवश्यक असून या मोराच्या मृत्यूला वन विभागाच जबाबदार असल्याचे मत बोरा यांनी व्यक्त केले. वन विभागावर गुन्हे का दाखल करू नये, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -