घरमहाराष्ट्रनाशिकब्रह्मगिरी ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : भुजबळ

ब्रह्मगिरी ‘इको सेन्सिटिव्ह’ झोन जाहीर करा : भुजबळ

Subscribe

उत्खननासह अवैध बांधकामांची केली पाहणी

नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसराला पर्यावरण, पर्यटन आणि धार्मिक असे महत्व आहे. त्यामुळे कुठलाही विकास करतांना पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, पर्यावरण व धार्मिक महत्व असलेल्या ब्रह्मगिरी परिसरात नदीचे स्त्रोत नष्ट केले जाताहेत. ब्रह्मगिरी पर्वत पोखरून अवैध बांधकाम सुरू आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन हा भाग नो डेव्हलमेंट व इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

पर्यावरणवादी तसेच साधू महंतांकडून ब्रह्मगिरी परिसरातील अवैध उत्खननाबाबत आवाज उठविला जात आहे. या प्रश्नाची दखल घेत छगन भुजबळ यांनी नागपूर येथील अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरात उत्खनन होणार नाही, तसेच उत्खनन केलेल्यांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. याबाबत भुजबळांनी प्रत्यक्ष ब्रह्मगिरी परिसराची पाहणी केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, २० डिसेंबर २०२२ रोजी त्र्यंबकेश्वर येथील नदीपात्रामध्ये पर्यावरणाला बाधा निर्माण करणार्‍या बांधकामाची साधूंच्या जत्थ्याने चिडून तोडफोड केली होती. ब्रह्मगिरी पर्वताचे उत्खनन आणि नदीपात्रातील अवैध बांधकामांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये म्हणून आंदोलन करणार्‍या पर्यावरणप्रेमी नागरिकांवर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने २२ डिसेंबर २०२२ रोजी कलम ३५३ व ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

गोदावरीचे उगमस्थान, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून, पशुपक्षांचे स्थलांतर होत आहे. या उत्खननामुळे पर्वताच्या कडा कोसळून त्र्यंबकेश्वर शहराला धोका निर्माण होणार आहे. या परिसराचा विकास करताना शासनाने स्थानिक आदिवासींना पर्यावरणपूरक घरे बांधून द्यावीत. परिसरात काँक्रिटीकरण न करता केवळ पायवाटा विकसित करण्यात याव्या आणि कायद्याच्या मार्गाने येथील प्रश्न सोडविण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी महंत गोपालदास महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष बहिरू मुळाने, शहराध्यक्ष मनोज कान्हव, अरुण मेढे, गोकुळ बत्तासे, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -