‘ज्ञानगंगा’ प्रवाहित होण्यासाठी ध्यान, ज्ञान, ग्यान आवश्यक : श्री श्री रविशंकर

नाशिक : रामायण महाभारत ही महाकाव्य भारताची धरोहर असून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत, दहा हजार वर्षानंतरही इंडोनेशिया, जर्मनीत रामायणाचा प्रभाव दिसून येतो. पवित्र पुण्यनगरी नाशिकनगरीत रामरक्षेच्या सामुहीक पठणाने आकाश तत्त्वात आनंदाची निर्मिती झाली. ‘ज्ञानगंगा’ प्रवाहित होण्यासाठी ध्यान, ज्ञान, ग्यान आवश्यक आहे, राम म्हटल्यानंतर आकाशात बीज पेरले जाते म्हणूनच त्यास बीज मंत्र म्हणतात, रामरक्षा, हनुमान चालीसा, देवी कवच यामुळे शक्तीसह आनंदाचे प्राप्ती होते. जीवनात सफलता प्राप्त होण्यासाठी पुर्वजांची पुण्याई आणि परिश्रम या दोघांचीही आवश्यकता असते अशा पुण्यवचनांद्वारे श्री श्री रविशंकर यांनी नाशिक नगरीत रामनामाचे महत्त्व विषद केले.

मंगळवारी (दि.28 फेब्रुवारी) श्री श्री रविशंकर यांच्या सानिध्यात नाशिक येथील ठक्कर डोम मैदानावर आयोजित ज्ञानगंगा या महासत्संगासह सामूहिक श्रीरामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ध्यान, ज्ञान आणि ग्यान यांचे महत्व आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रणेते गुरु श्री श्री रविशंकर यांनी विशद केले. नाशिककरांनी श्री श्री रविशंकर यांचा अमृत वचनांसह सत्संग अनुभवला. सामूहिक रामरक्षा पठणानेे संपूर्ण वातावरणात अद्वितीय चैतन्य निर्माण झाले.

ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ध्यान आवश्यक असून ध्यानाद्वारेच आकाश तत्त्वातून ज्ञान आपल्यात उतरते यासाठी जवळपास वीस मिनिटे त्यांनी उपस्थित भाविकांना ध्यान करण्यास सांगितले. ईश्वराचे अस्तित्व आणि व्यापकता ध्यानातूनच अनुभवास येते, हृदयातील ज्ञानगंगा ध्यानानेच प्रवाहित होते 68 तीर्थांचा समावेश ध्यानातच असून आनंदी जीवनासाठी ध्यान आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भगवद्गगीतेत ध्यानाचे महत्त्व विशद केले असल्याने प्रत्येकाने गीता वाचायला हवी, योगवसिष्ठही वाचायला हवा. योगवसिष्ठातुनच श्रीरामांना आत्मज्ञान झाले यासाठी योग प्रत्येकाने समजुन करायला हवा. भारतीय धार्मिक ग्रंथांच्या आधारेच अमेरिकेत विज्ञानाधिष्ठित मॅट्रिक्स सारख्या सिनेमांची निर्मिती होत आहे योगवसिष्ठ या ग्रंथाचे अमेरिकतील न्युयॉर्कमध्ये इंग्रजीत प्रकाशन करण्यात आले असल्याचेही श्री श्री रविशंकर यांनी धर्माचे महत्व विषद करतांना सांगितले.