घरमहाराष्ट्रनाशिकगणेशोत्सवात ‘स्मार्ट’ कामांचे विघ्न; खड्ड्यांविषयी तीव्र नाराजी

गणेशोत्सवात ‘स्मार्ट’ कामांचे विघ्न; खड्ड्यांविषयी तीव्र नाराजी

Subscribe

नाशिक : नाशिकचा गणेशोत्सवात यंदा स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या धिम्म्या गतीच्या कामांचे विघ्न येणार असून, स्मार्ट सिटीसह पालिका प्रशासनाच्या दिरंगाईने खड्डेमय झालेल्या शहरात गणेशभक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मुख्य म्हणजे विसर्जन मार्गावरही प्रचंड मोठे खड्डे पडलेले असून, तोंडावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही पालिका प्रशासन ढिम्म असल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित संयुक्त बैठकीत संताप व्यक्त केला.

नाशिक शहराचा विचार केल्यास जुने नाशिकसह रविवार कारंजा, पंचवटी, मेनरोड, शालिमार आदी भागांत प्रामुख्याने गणेशोत्सवात मोठी धूम असते. येथील देखावे आणि गणेश मंडळांची सजावट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त येत असतात. परिणामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या भागातील आणि शहरातील अन्य भागातील रस्ते तातडीने दुरुस्त होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात उत्सव तोंडावर येऊनही रस्त्यांची कामे न झाल्याने तसेच सर्वच रस्ते खड्ड्यांत गेले असल्याने गणेश मंडळ पदाधिकार्‍यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. गुरुवारी (दि. १८) सायंकाळी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणेश मंडळांसह वीज वितरण, महापालिका प्रशासन, बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांची गैरहजेरी सर्वांनाच खटकली. असंख्य तक्रारी या स्मार्ट सिटीअंतर्गत होत्या. शहरातील प्रमुख वर्दळीच्या भागात, तसेच गणेश विक्रीच्या ठिकाणी, गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांबाबत यावेळी गणेश मंडळ पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पोलीस आयुक्तांनी या बैठकीत करण्यात आलेल्या तक्रारी आणि सूचना स्मार्ट सिटी अधिकारी, तथा पालिका आयुक्तांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणीही मंडळ पदाधिकार्‍यांनी केली. रस्त्यांचे प्रचंड कर आणि मंडळांकडून जाहिरात कर मागितले जात असल्याबाबतही यावेळी मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर महापालिका आयुक्त तसेच स्मार्ट सिटी पदाधिकारी या बैठकीस कार्यालयीन कामामुळे उपस्थित न राहू शकल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -