ई कॉमर्स कंपन्यांचे ५२ हजार कोटींचे टार्गेट

ई-कॉमर्स कंपन्यांचे 52 हजार कोटींचे टार्गेट, दिवाळी फेस्टिव्हल सेलमधील उलाढाल थक्क करणारी

online-shopping

कोरोनाने भारतीय ग्राहकांचे कंबरडे मोडले असले तरीही यंदाच्या ई कॉमर्स कंपन्यांच्या ऑनलाईन फेस्टिव्हलमध्ये मात्र याचा थांगपत्ता कुठेच लागत नाही. एकूणच ई-कॉमर्स कंपन्यांनी दिवाळी फेस्टिव्हल सेलमधील उलाढाल थक्क करणारी आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत वर्क फ्रॉम होमची संकल्पना, लॉकडाऊन, पर्यटन, हॉटेलिंग आणि प्रवासावरील मर्यादा याचा परिणाम हा यंदाच्या ऑनलाईन ई कॉमर्स सेलच्या धमाक्यात दिसून आलेला आहे.

भारतातील सर्वात मोठ्या ई कॉमर्स जायंट्सने दिवाळीच्या निमित्ताने फेस्टिव्हल कालावधीत अवघ्या काही दिवसातच कोट्यवधी रूपयांची उलाढाल केली आहे. फेस्टिव्ह सिझन सेल्सच्या माध्यमातून येत्या दिवसांमध्ये ही उलाढाल 52 हजार कोटींवर पोहचेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात अवघ्या चार दिवसांच्या कालावधीतच 26 हजार कोटींची उलाढाल एकट्या भारतातच ई कॉमर्स कंपन्यांकडून झालेली आहे.

यंदाच्या फेस्टिव्ह सिझनमध्ये 1100 नवीन उत्पादने लाँच करण्यात आली. त्यामध्ये अ‍ॅमेझॉनने सॅमसंग, अ‍ॅपल, शिओमी, वनप्लस, असुस, लिनोव्हो, एचपी, एलजी, व्हर्लपुल, बजाज अप्लायन्सेस यासारख्या कंपन्यांनी आपली उत्पादने सेलमध्ये मांडली. वर्क फ्रॉम होमच्या यंदाच्या ट्रेंडमुळे मोठ्या प्रमाणात बोलबाला राहिला तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा. त्यामध्ये मोठ्या स्क्रिनचे टेलिव्हिजन, लॅपटॉप्स, आयटी एक्सेसरीज यासारख्या वस्तूंचा खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

महत्वाचे म्हणजे गतवर्षीच्या तुनेलत यंदा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदीत वाढ झालेली पहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये जवळपास 20 हजार कोटी रूपयांची उलाढाल झाली होती. ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत ही उलाढाल 30 टक्के जास्त होती. यंदाही कोरोनाचे संकट असूनही गतवर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्क्यांनी उलाढाल वाढलेली आहे. अनेक कंपन्यांना आपल्या वर्षभरातील वस्तूंच्या विक्रीपैकी एकट्या दिवाळीतच होणारा खप हा 30 ते 35 टक्के इतका मोठा असतो. यंदाच्या वर्षी अनेक ब्रॅण्डसने कमी सवलत देऊनही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. त्यामध्ये स्मार्टफोन, फॅशन, फर्निचर यामध्ये सर्वाधिक सवलत मिळाली. तुलनेत यंदा टेलिव्हीजन आणि होम अप्लायन्सेससाठी तशी सवलतही कमीच होती.

एकूणच ई कॉमर्सची यंदाची उलाढाल ही दिवाळीच्या संपूर्ण कालावधीत 52 हजार कोटी रूपये होईल असा या क्षेत्रातील अभ्यासकांचा दावा आहे. यंदा छोट्या शहरातून तसेच पहिल्यांदाच ऑनलाईन शॉपिंग करणार्‍या ग्राहकांची संख्या वाढलेली पहायला मिळत आहे. यंदाच्या दिवाळीच्या सेलमधील 75 टक्के उलाढाल ही एकट्या 15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत पहायला मिळाली आहे. यंदाच्या वर्षी मोबाईल टॉप ब्रॅण्डमध्ये सॅमसंग, अ‍ॅपल, एलजी, शिओमी यासारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये 80 ते 100 टक्के इतकी विक्रीतली वाढ पहायला मिळाली आहे. ऑनलाईन फोकस असलेल्या टीव्ही ब्रॅण्डमध्ये कोडॅक आणि थॉमसन या कंपन्यांचे टेलिव्हिजन यंदा दुपटीने विकले गेले आहेत.

गेल्या सहा महिन्यात हॉटेलिंग, पर्यटन, प्रवास आणि आरामदायी गोष्टींवर पैसे खर्च करण्यावर मर्यादा होत्या. त्याचाच परिणाम हा ई कॉमर्स सेलमध्ये गुंतवणुकीवर पहायला मिळाला आहे. ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद देत ऑनलाईन फेस्टिव्हलला प्रतिसाद दिला असल्याचे चित्र आहे. दरवर्षी भरघोस सवलत देणारे हुवेई, हॉनर, असुस यासारखे ब्रॅण्ड या सेलमध्ये उतरले नाहीत. तर बीपीएल आणि व्हीयू यासारखे ब्रॅण्डदेखील ऑनलाईन फेस्टमध्ये सहभागी झाले नाहीत. चीनच्या वस्तूंवर आयातीसाठी मर्यादा आल्यानेच यंदा हे ब्रॅण्ड्स सेलमध्ये दिसले नाहीत.