मतदारयाद्यांना सर्वपक्षीय विरोधानंतर अखेर हरकतीसाठी मुदतवाढ

प्रत्येक प्रभागात सुमारे तीन हजार नावांबाबत गोंधळ, बहुतांश मतदारंची नावे प्रभागाबाहेर

नाशिक : प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या अपलोड करण्यास विलंब झाला असताना या मतदारयाद्यांमध्ये मोठा गोंधळ असल्याचे सांगत राजकीय पक्षांसह इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने आरक्षित जागा धोक्यात येण्याची भीती इच्छुकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांकडून आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, मनसेनेही निवेदन देत प्रत्येक प्रभागात सुमारे अडीच ते तीन हजार मतदारांच्या नावाबाबत गोंधळ झाल्याचे म्हटले आहे.

महापालिकेच्या वतीने २३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारांच्या याद्या सदोष असून या याद्या प्रभागाच्या हद्दीनुसार होणे अपेक्षित होते. प्रभागाच्या चतु:सीमा महापालिकेने ठरवून दिलेल्या हद्दीनुसार झाल्या असल्या तरी प्रभागातील मतदारांची नावे मोठ्या संख्येने प्रभागाबाहेर गेल्याचे निदर्शनास आले आहे. तर, दुसर्‍या प्रभागातील नावे त्या प्रभागात समाविष्ट झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विधानसभेच्या याद्यांनुसारच मतदारांची नावे येणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. परिणामी मतदानाची टक्केवारी घसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. महापालिकेने प्रभागरचनेनुसार केलेले जनगणनेचे ब्लॉक आपल्याकडे उपलब्ध असतानाही प्रभागनिहाय मतदारयाद्यांमध्ये झालेल्या चुका गंभीर असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे मतदारयाद्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच, हरकती नोंदविण्यास दिलेला कालावधी अत्यंत कमी आहे. सर्व ४४ प्रभागांतून या सदोष प्रारूप मतदार याद्यांबाबत प्रचंड नाराजीचा सूर असल्याने त्यासंदर्भात आक्षेप नोंदविण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, त्यासाठी ही मुदत आणखी १५ दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांना भेटलेल्या शिष्टामंडळात माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे, मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, पश्चिम नाशिक विधानसभाप्रमुख सुभाष गायधनी, उपमहानगरप्रमुख नाना पाटील, उपविभागप्रमुख संदीप लभडे उपस्थित होते. या सदोष याद्या कोणाच्या आशीर्वादाने तयार करण्यात आल्या, असा सवालही माजी नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

 

हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलैपर्यंतची मुदत आता 3 जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या संबंधित महापालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ट्रू- व्होटर अ‍ॅपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती; परंतु ही मुदत आता 3 जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुटीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था केली जाणार आहे. महापालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल अ‍ॅपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ट्रू-व्होटर मोबाईल अ‍ॅप ‘प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. ‘व्होटर लीस्ट’ सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकतीसाठी ‘व्होटर लिस्ट ऑब्जेक्शन’वर क्लिक करून ‘व्होटर लिस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022’ निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन हरकत नोंदविता येईल. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास प्रभाग चुकीचा वाटप झाला असेल किंवा विधानसभेच्या मतदारयादीत नाव असूनही पालिकेच्या मतदारयादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.