घरमहाराष्ट्रनाशिकजळगाव येथे उष्णतेच्या लाटेने शेतकर्‍याचा मृत्यू

जळगाव येथे उष्णतेच्या लाटेने शेतकर्‍याचा मृत्यू

Subscribe

उष्णतेची लाट, जळगावचा पारा थेट ४१, नंदुरबार ४२ अंशावर

जळगाव : उत्तर भारतातून महाराष्ट्रात धडकलेल्या उष्णतेच्या लाटेने जळगावातील एका शेतकर्‍याचा बळी घेतला आहे. बहुतांश जिल्ह्यांचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला असून, दोन दिवस ही लाट कायम राहणार असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव व धुळ्याचा पारा ४१ तर, नंदुरबारचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या उष्णतेच्या लाटेने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मारवड गावातील जितेंद्र संजय माळी या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. माळी हे शेतात भर उन्हात दिवसभर काम करत होते. सायंकाळी काम करत असतानाच त्यांना चक्कर आले.

ही बाब लक्षात येताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारांसाठी माळी यांना अमळनेरला हलविण्यात आले. रस्त्यातच ते पुन्हा बेशुद्ध झाले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. माळी यांना उष्माघातसदृश लक्षणे होती. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली.

- Advertisement -

प्रशासनाकडून आवाहन

जळगाव जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च हे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून बचाव व उपाय योजनेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेत उष्माघाताचा घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन पालिका प्रशासन व आरोग्य विभागालादेखील सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनादेखील उष्णतेच्या लाटेत उपाययोजना राबवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मंगळवारी ३८.१ अंश सेल्सिअस तर मालेगावमध्ये ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

येथे जाणवणार दाहकता

हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार विदर्भामध्ये ३० मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत २९ ते ३१ मार्चला उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यातच जळगावकरांचे अंग भाजून काढणारे ऊन पडू लागले आहे. होळीनंतर आलेल्या उष्णतेच्या लाटेने पारा ४० अंशाच्या पुढे गेला होता. दरम्यान, हवामान विभागाने रविवारी  नवा अलर्ट जारी करत मार्चअखेरीस उष्णतेची लाट येणार असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाली असून यंदा उष्णता सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. गेल्याच आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे पारा ४० अंशाच्या पुढे गेला होता. दरम्यान त्यानंतर अचानक वातावरण बदलून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -