नाशिक येथील लाॅजिस्टीक, आयटी पार्कसाठी पाच संस्थांचा प्रतिसाद

आडगाव-म्हसरुळ या नव्याने विकसित पट्ट्यात ६५ एकर जागेत उभारणार पार्क

नाशिक : जिल्ह्यातून जाणार्‍या प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाला लागून लॉजिस्टीक पार्क साकारण्यासाठी आडगाव-म्हसरुळ या नव्याने विकसित होत असलेल्या पट्ट्यात ६५ एकर जागेत लॉजिस्टीक पार्क उभारण्याची तयारी महापालिकेने केली आहे. पहिल्या टप्प्यात मागविण्यात आलेल्या स्वारस्य अभिदेकाराला (एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट) तीन तर आयटी पार्कसाठी पाच संस्थांनी प्रतिसाद दिल्याने भाजपच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला बळ मिळाले आहे. पीपीपी तत्वावर मॉडेल विकसित करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहे.

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. त्यावेळी सुरत-चेन्नई ग्रीन फिल्डचा या भारतमाला प्रोजेक्टमधील महामार्गाचा उल्लेख करताना नाशिक जिल्ह्यातून १२२ किलोमीटर प्रवास या महामार्गाचा होत असल्याने दिल्लीच्या धर्तीवर या महामार्गालगत लॉजिस्टीक पार्क उभारण्याचे आवाहन महापालिकेला केला होते.

लॉजिस्टीक पार्कसाठी एक हजार कोटी रुपये देण्याची तयारीदेखील दर्शवली. तसेच मागील आठवड्यात मुंबई येथेही राज्यात पाच ठिकाणी लॉजिस्टीक पार्कची घोषणा गडकरी यांनी केली. त्यात नाशिकचा समावेश करण्यात आला. शहर विकासाच्या दृष्टीने ही बाब महत्वाची ठरणार असल्याने सत्ताधारी भाजपने महासभेत लॉजिस्टीक पार्कचा प्रस्ताव मंजूर केला. लॉजिस्टीक पार्क आडगाव-म्हसरुळ भागात साकारले जाणार आहे. त्यासाठी स्वारस्य देकार मागवण्यात आले. त्यात मते असोसिएट्स, विजयगीत मार्केटिंग प्रा.लि. तसेच गजराज एन्टरप्राईजेस या कंपन्यांनी जागा देण्यात स्वारस्य दाखवले.

आयटी पार्कला प्रतिसाद

आडगाव शिवारातील सर्वे क्रमांक ११०३ पैकी मधील दहा एकर जागेसह सर्वे क्रमांक ११०३, ११०१, ११०४, ११०५, ११०६, ११०९, १११०, ११११, १११२ व म्हसरूळ शिवारातील सर्वे क्रमांक ९३ ते ९५, ९७, ९८ व १०३ या ना विकास क्षेत्रात आयटी पार्कचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. आयटी पार्कसाठी चालू अंदाज पत्रकात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आयटी पार्कच्या जागेत ३० मीटरचे रस्ते विकसित करणे, मार्केट, शॉपिंग सेंटर, पाण्याची सुविधा, बस टर्मिनल आदी प्रकारच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
पार्क विकसित करण्यासाठी महापालिकेच्या पॅनलवरील वास्तूविशारदांची नियुक्ती करण्यात आली. आयटी कंपन्यांचा नाशिकमध्ये विस्तारासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी स्थापन केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर व टेक्नॉलॉजी सेंटरसाठी निधी मंजूर केला जाणार आहे. दरम्यान, आयटी पार्कसाठी मागविण्यात आलेल्या स्वारस्य देकारात मते असोसिएट्स, गजराज एन्टरप्राईजेस, साधना पटेल, अनिल त्रिभुवनलाल काल्या, पीयूष सिसोदिया यांनी जमीन देण्यास स्वारस्य दाखवले.

आयटी कंपन्या नाशिकमध्ये येण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहे. महासभेत प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता स्वारस्य देकाराच्या माध्यमातून जागा देण्यास स्थानिक जमीन मालक तयार असल्याने ही एक सकारात्मक बाब आहे.

सतीश कुलकर्णी, महापौर

शहरातून प्रवेश करणाया अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनल्स, कूलिंग प्लॅन्ट, वॅर्कशॉप, मॉल, ट्रान्सपोर्ट, गोडावून, शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्या आदींची व्यवस्था होणार असल्याने प्रदूषण कमी होण्याबरोबरच रोजगार उपलब्ध होईल.

– गणेश गिते, सभापती, स्थायी समिती