घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद झेडपीचा प्रारुप आराखडा रद्द

महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद झेडपीचा प्रारुप आराखडा रद्द

Subscribe

निवडणूक विभागाने काम थांबवले; ग्रामपंचायतीची सुनावणी स्थगित

नाशिक :  महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेचा प्रारुप आराखडाही रद्द झाला आहे. जिल्हा परिषद गट व गणांची नव्याने रचना होण्याची शक्यता असली तरी ही प्रकिया आता किती दिवस लांबणीवर पडेल याविषयी इच्छुकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडील निवडणूक घेण्याचे अधिकार आता राज्य सरकारने स्वत:कडे घेतले आहेत. त्यामुळे 20 मार्च 2022 रोजी मुदत संपत असलेल्या राज्यातील 25 जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे.

तसेच, 283 पंचायत समित्यांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपला आहे. या ठिकाणी किमान चार महिने प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकार्‍यांचा अखेरचा आठवडा शिल्लक असल्याने त्यांनी कामांना गती दिली आहे. तर दुसरीकडे जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा प्रारुप आराखडा रद्द केला आहे. निवडणुकीचे संपूर्ण कामकाज राज्य सरकारच्या आखत्यारित गेल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया होईल.

- Advertisement -

तोपर्यंत निवडणूक विभागाने हे कामकाज थांबवले आहे. नवीन प्रारुप आराखडा अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु, जिल्ह्यात 11 गटांची संख्या वाढून एकूण 84 गट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर 168 गण जिल्ह्यात तयार होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. राज्य सरकारच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया थांबली असून त्यावर राज्य सरकारच निर्णय घेणार आहे. त्यामुळे किमान चार महिने निवडणुका लांबणीवर पडल्याचे आता बोलले जाते. दरम्यान, जिल्ह्यातील 419 ग्राम पंचायतींची मंगळवारी (दि.15) जिल्हा निवडणूक विभागाकडे प्रारुप आराखड्यासंदर्भात सुनावणी होती. ही सुनावणी प्रक्रियाही या विभागाने रद्द करुन त्यांच्याही आराखड्याची प्रक्रिया थांबवली आहे.

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सुधारित अधिनियमांनुसार आजपर्यंत तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडा रद्द झाला आहे. निवडणुकीचे अधिकार आता राज्य सरकारकडे गेले आहेत.
– नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी

चार महिने निवडणूका लांबणीवर

  •  निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारकडे आल्यामुळे आता नवीन प्रारुप आराखडा तयार होईल. या आराखड्यावर हरकती मागवल्या जातील आणि त्या हरकती निकाली काढण्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागू शकतो. त्यामुळे प्रारुप आराखडा अंतिम करुन निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी किमान चार महिन्यांचा अवधी लावण्याची शक्यता आता बळावली आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -