Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र माजी आमदार चव्हाणांनाच औषधोपचारांची गरज; आ. बोरसे यांचे टीकेला प्रतिउत्तर

माजी आमदार चव्हाणांनाच औषधोपचारांची गरज; आ. बोरसे यांचे टीकेला प्रतिउत्तर

Subscribe

नाशिक : सबागलाण तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब व आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या सोयीसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजुरीसोबतच आदिवासी भागातील मुल्हेर येथे स्वतंत्र ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. संपूर्ण तालुक्यातील आरोग्य केंद्रातील कामकाज सुधारण्यावर भर देतानाच रिक्त पदे भरण्यासाठीही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निकाली निघण्याची भीती वाटल्यानेच माजी आमदार दीपिका चव्हाण यांना वाईट वाटते आहे. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्या आरोग्य विभागाबाबत बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांनाच उपचारांची गरज आहे, अशी टीका आमदार दिलीप बोरसे यांनी केली.

आपल्या काळात शून्य विकास झाला म्हणून चव्हाण नेहमीच विरोध करतात. उपजिल्हा रुग्णालय, मुल्हेर ग्रामीण रुग्णालय मंजूर केल्यामुळे चव्हाण यांना वाईट वाटते आहे. बागलाणमधील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे त्यांनी शासकीय यंत्रणेत लुडबुड करणे बंद करावे, असा सल्लाही आमदार बोरसेंनी दिला. सटाणा शहर व तालुक्याने दोनवेळा दीपिका चव्हाण व संजय चव्हाण दाम्पत्याकडे सत्ता दिली. मात्र, विकासकामात ते सपशेल अपयशी ठरले. सटाणा शहरवासीयांनी चव्हाण दाम्पत्याला भरभरून प्रेम दिले असतानाही शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठा योजना राबविता आली नाही. त्यांनी केवळ पाण्याचे राजकारण केले.

- Advertisement -

परंतु, तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने शहरासाठी पूनद पाणीपुरवठा ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आली. तेव्हासुद्धा शहरासाठी वरदान ठरणार्‍या योजनेत खोडा घालण्याचे काम कुणी केले, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. सटाणा स्मार्ट सिटी करण्यासाठी वर्षभरात आपण तब्बल ५१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरण, तिर्थस्थळांचे सुशोभिकरण, जॉगिंग ट्रॅक, जुने गाव व नवीन वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण अशी विक्रमी कामे सुरू झाल्याने शहराचा कायापालट होताना दिसत आहे. हा विकास चव्हाण दाम्पत्यासाठी मोठे अपयश आहे. त्या नैराश्यातूनच तोंडाला येईल तसे ते बडबडत असल्याची टीकाही आमदार बोरसे यांनी केली.

तालुक्यात विकासकामांची ऐतिहासिक घोडदौड सुरू असताना गारपीट, अवकाळी यांसारखी नैसर्गिक आपत्ती आली. बळीराजाला धीर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट बांधावर येऊन मदत जाहीर केली. सद्यस्थितीत प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्‍याच्या खात्यावर प्रत्यक्ष अनुदान जमा होत आहे. कांदा अनुदानाचीदेखील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, बळीराजाला दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन करत आहे. उन्हाळ कांदा अधिक प्रमाणात खरेदी करून शेतकर्‍यांना न्याय देण्याबाबतीत शासन पातळीवर सकारात्मक निर्णय होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

आरोग्याची काळजी घेण्यास आम्ही सक्षम

- Advertisement -

बागलाणच्या जनतेसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्यामुळे आगामी काळात नाशिक, धुळे, मालेगावी जाण्याची गरज राहणार नाही. या रुग्णालयात अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध होणार आहेत. मुल्हेर ग्रामीण रुग्णालय मंजूर होऊन प्रत्यक्ष इमारत बांधकामाला सुरुवात झाली आहे. बागलाणच्या जनतेसाठी आरोग्यसुविधा उपलब्ध होत आहेत, हे चव्हाण दाम्पत्यासाठी मोठे अपयश असल्याने त्यांना नैराश्य आले आहे. त्या नैराश्यातून ते बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप आमदार बोरसे यांनी केला. आरोग्य विभागाची रिक्त पदे भरण्यासाठी आपण आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली असून, त्यानुसार लवकर आरोग्य विभागाच्या पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उठसूट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार, असे सांगायचे आणि फुकटची प्रसिद्धी मिळवायची, हा फंडा आता बंद करावा, असा इशाराही आमदार बोरसे यांनी चव्हाण दाम्पत्याला दिला.

- Advertisment -