घरमहाराष्ट्रनाशिकआजपासून महागाईची गुढी

आजपासून महागाईची गुढी

Subscribe

सामन्यांच्या खिशाला बसणार झळ

नाशिक : महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यात सतत वाढणारे इंधनाचे दर, गॅस सिलेंडर, तेलाचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. एक एप्रिल म्हणजेच आजपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक बदल होणार आहेत. चलनवाढ व पुरवठा साखळीची समस्या, रशिया युक्रेन युध्दामुळे अनेक वस्तूंच्या किंमती वाढणार आहे. या वाढलेल्या किंमतीचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. अगदी हात धुण्याच्या साबणपासून ते किराणा, औषधे, पेट्रोल, डिझेल, गॅस, इलेक्ट्रिक वस्तू, घरांच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. यावर ज्वलंत मुद्द्यावर आपलं महानगरने टाकलेला प्रकाशझोत.

  • घरे महागणार

बांधकामासाठी लागणारा कच्चा माल प्रचंड महाग झाला आहे. आता पूर्वीच्या दरात घरे विकणे परवतड नसल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात. कच्च्या मालासोबतच मजुरीदेखील वाढली आहे. त्यामुळे घरांच्य दरामध्ये वाढ अटळ मानली जात आहे. येत्या आर्थिक वर्षामध्ये घरांच्या किमती महाग होतील.

- Advertisement -
  • हे होणार स्वस्त

अर्थसंकल्प २०२२ मध्ये अनेक वस्तूंवर सीमा शुल्क, आयात शुल्क तसेच अनेक शुल्क वाढवणे आणि कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे कपडे, चामड्याचे सामान, मोबाईल फोन, चार्जर, हिरे, हिर्‍याचे दागिने, शेतीची अवजारे, पॉलिश केलेले हिरे, विदेशी मशीन इलेक्ट्रॉनिक साहित्य स्वस्त होईल.

  • हे महागणार

इमिटेशन ज्वेलरी,लाऊडस्पिकर, हेडफोन, इअरफोन, सोलर सेल, एक्स-रे मशीन, इलेक्ट्रॉनिक्स खेळणी, छत्री महाग होईल.

- Advertisement -
  • वाहने

नवीन कारच्या किंमती उच्चांकावर आहेत. तर, वापरलेल्या कार आणि ट्रकच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व आर्थिक स्तरातल्या लोकांना याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. टाटा मोटर्स, बीएमडब्ल्यू, टोयोटा, मर्सिडीज, ऑडी या कंपन्या कारच्या किंमतीत वाढ करणार आहेत. ही वाढ २ ते ४ टक्क्यांपर्यंत असेल.

  • टीव्ही., फ्रीज

१ एप्रिलपासून अ‍ॅल्युमिनियम धातुवर ३० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. याचा वापर टीव्ही, एसी आणि फ्रीजसाठी हार्डवेअर बनविण्यासाठी केला जातो. याशिवाय कॉम्प्रेसरमध्ये वापरल्या जाणार्‍या पार्टसवरही आयात शुल्क वाढविण्यात आले आहे. त्यामुळे टीव्ही, फ्रीज, रेफ्रिजरेटरच्या किंमती वाढणार आहेत.

  • इंधन 

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तीन आठवड्यापूर्वी कच्चे तेल गेल्या चौदा वर्षातील सर्वोच्च किमतीवर पोहोचले होते. सध्या त्यामध्ये काहीसी घसरण दिसत असली तरी देखील सध्या कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्याच आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढताना दिसत आहेत.

  • सीएनजी स्वस्त

महाराष्ट्र सरकारने सीएनजीवर लागणारा वॅट कमी केल्याने राज्यात सीएनजीच्या किमती कमी होणार आहेत. या निर्णयामुळे ५ ते ७ रूपयांनी सीएनजी कमी दराने ग्राहकांना मिळेल. याशिवाय प्रदूषण कमी होण्यातही याची मदत होईल.

  • औषधांच्या किंमती वाढणार

उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. नव्या आर्थिक वर्षात जवळपास 800 जीवनावश्यक औषधांचे दर वाढणार आहेत. औषधांचे दर वाढल्याने याचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो. वैद्यकीय खर्चामध्ये वाढ होईल.

  • कटिंग चहा महागला

सर्वसामान्यांपासून कष्टकरी वर्गाचे आवडते पेय असणारा चहा आता दोन रुपयांनी महागणार आहे. टी कॉफी असोसिएशनच्या वतीने राज्यात चहाचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून महागाई वाढत असल्याचे दिसत होते. त्याची झळ आता सर्वसामान्यांना बसू लागली आहे. आता, दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आले आहे. साखर, दूध, चहापावडर यांचे भाव वाढल्याने चहाचे दर ही वाढले आहेत. काही दिवसांपूर्वीच दूधाच्या दरात दोन रुपये प्रति लिटर इतकी दरवाढ करण्यात आली होती. त्याशिवाय चहासाठी आवश्यक असणार्‍या इतर वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने चहा विक्रेत्यांना आर्थिक गणित जमवणं अधिक कठीण होत होते. त्यानंतर चहा विक्रेत्यांची संघटना असलेल्या टी कॉफी असोसिएशनच्या वतीने चहाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.

  • प्रॉव्हिडंट फंड (PF)

पुढील आर्थिक वर्षामध्ये पीफच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. जर तुमच्या पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक योगदान असेल तर तुम्हाला मिळणार्‍या व्याजावर टॅक्स भरावा लागणार आहे.

  • एलपीजी

1 एप्रिल रोजी पुन्हा एकदा नवीन दर जाहीर होणार असून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 ते 100 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील निवडणुकांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिलासा मिळाला होता.

  • पॅन- आधार लिंक

आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज आधार-पॅन लिंक नसेल तर पॅन कार्ड चालूच राहणार आहे. मात्र, उद्यापासून आधार, पॅन लिंकिंगसाठी पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर, 30 जूननंतर दंडाच्या रकमेत वाढ केली जाणार असून, त्यानंतर आधार, पॅन लिंक करण्यासाठी एक हजारांचा दंड आकारण्यात येईल.

  • वाहन विमा

येत्या एप्रिल महिन्यांपासून थर्ड पार्टी विमा महागणार आहे. त्यामुळे दुचाकी, तीन चाकींसह कार चालकांच्या खिशाला फटका बसणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या प्रस्तावासह 1000 सीसी खासगी कार असलेल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स 2 हजार 14 रुपये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2019-20 मध्ये तो 2 हजार 72 रुपयांना मिळायचा. खासगी कार 1000 सीसी ते 1500 सीसी दरम्यान असेल तर इन्शुरन्स 3 हजार 416 रुपयांनी मिळेल तर 1500 पेक्षा जास्त सीसीच्या कारचा इन्शुरन्स 7 हजार 897 रुपये होणार आहे. दुसरीकडे दुचाकी 150 सीसी ते 350 सीसी दरम्यान असतील तर थर्ड पार्टी इन्शुरन्स 1.366 रुपयांपासून सुरु होणार आहे. दुचाकी 350 सीसीच्यावर असेल तर इन्शुरन्स 2,804 रुपये असेल.

  • गरीबांचा बर्गर महागला

नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला व गरीबांचा बर्गर म्हणून ओळखला जाणारा वडापाव महागला आहे. गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचे फावल्या वेळेतील उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचे खाणे असलेला वडापाव आता चक्क १८ रुपयांवर पोहोचला. रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सिलिंडरच्या दरातही वाढ झाली असून त्याचा परिणाम वडापावच्या किमतीवर झाला आहे. वडापावचे दर ३ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.

  • टोलदराचा भडका

पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झालेली असताना आता १ एप्रिलपासून टोलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. एनएचएआयने राष्ट्रीय महामार्गांच्या टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टोलच्या दरात १० ते ६५ रूपयांनी वाढ झाली आहे. छोटया वाहनांसाठी १० ते १५ रूपये तर व्यावसायिक वाहनांसाठी ६५ रूपयांची वाढ झाली आहे. यामुळे प्रवास महागणार आहे.

 

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -