चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील घटना; औरंगाबाद पोलिसांकडून नाशिक पोलिसांना फोन

नवीन नाशिक : गेल्या काही दिवसांपासून थांबलेल्या खून सत्राच्या मालिकेत पुन्हा एकदा भर पडली असून अंबड औद्योगिक वसाहती जवळच्या दत्तनगर येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील घरात विवाहित महिलेचा खून झाल्याची माहिती वाळुंज, (औरंगाबाद) पोलिसांकडून अंबड पोलिसांना देण्यात आली. घटनेतील संशयित पती स्वतःहून वाळुंज एमआयडीसी पोलिसांत हजर झाला असून त्यानेच माहिती दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद सिटी कंट्रोल कडून मिळालेल्या माहितीनुसार अंबड पोलिसांनी दत्तनगर येथील घराचा शोध घेतला असता एका कुलूप लावलेल्या घरात २२ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान घटनेच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांचे एक पथक औरंगाबाद येथे रवाना करण्यात आले आहे.

सदर पती-पत्नी पाच दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथून दत्तनगर भागात रहायला आले होते. आपण रंगकाम करीत असल्याचे त्यांनी घरमालकाला सांगितले होते. मात्र घरात कोणतेही संसारोपयोगी साहित्य आढळून न आल्याने या कुटूंबाचा नाशिकला रहायला येण्याचा उद्देश संशयातीती असल्याचेही पोलिसांनी सांगितले.