घरमहाराष्ट्रनाशिकआदेश आल्यास गणेशोत्सवात वाजणार 'डीजे'

आदेश आल्यास गणेशोत्सवात वाजणार ‘डीजे’

Subscribe

नाशिक : नाशिकचा गणेशोत्सव यंदा दणक्यात साजरा करण्याची इच्छा मनी बाळगणार्‍या गणेशभक्तांसह मंडळ पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने यंदा खर्‍या अर्थाने बाप्पांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत आयुक्तांनी गणेश मंडळांना डीजे वाजवू शकतात, मात्र वरिष्ठांकडून आदेशाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. त्यासाठी आवाजाच्या मर्यादा आणि वेळेचे बंधन पाळावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले. याशिवाय मिरवणूक शेवटचा गणपती विसर्जित होईपर्यंत सुरू राहू शकते आणि अखेरचे पाच दिवस १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याचीही परवानगी असल्याचे सांगण्यात आल्याने गणेशभक्तांनी या निर्णय, सूचनांचे स्वागत केले.

नाशिकच्या गणेशोत्सवाची धूम राज्यभरात नावाजलेली आहे. येथील गणेशोत्सवातील ढोलचा निनाद आणि डीजेचा दणदणाट सर्वत्र परिचित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डीजेवर बंधने आणली गेल्याने गणेशभक्तांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर कोरोना काळातील निर्बंधांमुळेही दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यावर मोठी बंधने आली होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यास मुभा दिल्याने नाशकातही पोलीस यंत्रणेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गणेश मंडळांच्या अनेक मागण्यांचा सकारात्मक विचार केला जात असून, लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होऊन तशा अटी-शर्थी ठेवून गणेश मंडळांना परवानग्या दिल्या जाणार आहेत. तसे संकेत आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले.

मागण्यांचा सकारात्मक विचार

  • नाशिकच्या गणेश मंडळांकडून सर्वात प्रमुख मागणी ही ‘डीजे’ची करण्यात आली होती. त्यासाठी अनेक मंडळ पदाधिकार्‍यांसह अध्यक्षांनीही पोलीस आयुक्तांना विनंती केली. त्यावर मर्यादा पाळून कायद्याच्या अधिन राहून तसेच वेळेचेही बंधने पाळून डीजे वाजवण्यास परवानगीचा विचार करू, मात्र वरिष्ठांकडून परवानगीची प्रतीक्षा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अंतिम निर्णय जो होईल, त्याचे गणेश मंडळही पालन करतील असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला.
  • गणेश मंडळांची दुसरी प्रमुख मागणी होती ती एक खिडकी योजनेची. तिलाही आयुक्तांनी परवानगी देत सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळवता येतील, अशा एक खिडकी योजनेविषयी तयारी असल्याचे सांगितले. मंडळांना कमीत कमी त्रास होईल, याची हमीही पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली.
  • त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संबंधीत मंडळांना परवानगी अर्ज मिळावेत व ते स्विकारले जावेत अशा मागणीवरही सकारात्मक विचार सुरू असल्याचे आयुक्त म्हणाले.
  • गणेश मंडळांना वाहतूक, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम तसेच पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या परवानग्या घेताना होणारा विलंब टाळण्यासाठी एक खिडकी योजना राबवून गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवसापर्यंत परवानगी देण्यात यावी, ही मागणीही बैठकीत करण्यात आली, त्याचाही विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
  • शेवटचा गणपती विसर्जित होईपर्यंत परवानगी मिळावी, या मागणीलाही पोलीस आयुक्तांनी हिरवा कंदील दिला. मात्र, रात्री १२ वाजेनंतर वाद्य वादन न करता शांततापूर्वक मार्गाने गणेश विसर्जन करावे, अशा सूचना पोलिसांनी केल्या.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -