उन्हाच्या कडाक्यात दुपारी सिग्नल राहणार बंद

उन्हामुळे शहरात दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वर्दळ कमी असल्याने काही सिग्नल दुपारी बंद ठेवण्याचा निर्णय

नाशिक : शहरात उन्हामुळे दुपारच्यावेळी नाशिककर घामाघूम होत असून, सिग्नलवर थांबल्यास आणखीनच घामाघूम होत आहे. उन्हामुळे शहरात दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वर्दळ कमी असल्याने वाहनचालकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नाशिक शहर वाहतूक विभागाने सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे शहरातील काही सिग्नल दुपारी बंद ठेवण्याचा निर्णय नागपूरच्या धर्तीवर नाशिकमध्ये घेतला जाणार आहे.

शहरात उन्हाचा कडाका वाढला आहे. उन्हाचा पारा चाळीशीपर्यंत आला आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकजण घरीच थांबणे पसंत करत आहेत. मात्र, कामानिमित्त आणि अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना घराबाहेर जावे लागत आहेत. शहरातील सिग्नलला थांबल्यास वाहनचालकांना उन्हाचे चटके बसत असल्याने ते हैराण होत आहेत. सिग्नल लागला असेल तर अनेक वाहनचालक रस्त्यालगतच्या झाडाची सावली शोधून सिग्नल संपेपर्यंत थांबत असल्याचे दिसून येत आहे.

उन्हामुळे अनेक वाहनचालक सिग्नलला थांबण्यास टाळाटाळ करत असून, नियमांचे उल्लंघन करत आहेत. शहरात ५० सिग्नल आहेत. शहरातील महात्मानगर, सिटी सेंटर मॉल, आयटीआय, सीबीएस, शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका या सिग्नलजवळ झाडे आणि इमारतींच्या सावलीत दुचाकीचालक थांबत आहेत. उन्हापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी नागपूरमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ६४ सिग्नलपैकी २१ सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर नाशिक शहरात वाहतूक विभागाकडून सर्वेक्षण सुरु आहे. सिग्नलची वेळ, दुपारी गर्दी, वाहनांच्या रांगा आणि गरज ओळखून सिग्नल बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर पोलीस आयुक्तालयाकडून शहरात सिग्नल बंदबाबत लवकरच अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.