
नाशिक – निरपेक्ष भावनेतून केलेली जनसेवा हीच खरी आयुष्यातील संपत्ती आहे. सहकारी बँकेने अशा दुर्बल घटकांसाठी उभारलेले नामको हॉस्पिटल हे खरोखरच इतिहासातील आदर्श ठरावा, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. राजकारण हा पैसे कमाविण्याचा धंदा नाही तर समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. राजकीय व्यक्तींनी समाजोद्धारासाठी अंतःकरणापासून प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नामको हॉस्पिटलमधील श्री प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल कार्डिअॅक केअर सेंटरचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि.१८) आयोजत करण्यात आला होता. याप्रसंगी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. प्रकाश धारिवाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले, उद्योजक महेंद्र ओस्तवाल, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, नामको बँकेचे अध्यक्ष वसंत गिते, माजी आमदार बाळासाहेब सानप, संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख आदी उपस्थित होते.
केंद्रिय मंत्री गडकरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, १९९५ ते २००० दरम्यान महाराष्ट्रात मंत्री असताना नामको हॉस्पिटलचे संस्थापक हुकूमचंद बागमार यांचा जवळून परिचय होता. त्यांनी सहकारी बँक अत्यंत परिश्रमाने उभारली. ग्राहकांची विश्वसनीयता जपली आणि पुढे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून तब्बल सहा कोटी रुपये निधी देऊन या हॉस्पिटलची स्थापना केली. विद्यमान चेअरमन सोहनलाल भंडारी आणि सचिव शशिकांत पारख यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीच्या प्रयत्नांतून त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. हॉस्पिटलचे हे कार्य असेच पुढे सुरू राहील आणि हजारो रुग्णांचे प्राण वाचतील, अशा शब्दांत गडकरी यांनी रुग्णालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*
आपल्या मनोगतात दानदाते तथा प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये प्रथमच नामको हॉस्पिटलला भेट दिली होती. सहकारी संस्थेचे लहान-मोठे हॉस्पिटल असेल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत या संस्थेची भव्यता लक्षात आली. दातृत्व हा मनाचा भाव असला तरीही केलेला दान हे सत्कारणी लागणे अधिक महत्त्वाचे असते. अशा संस्थेला दान दिल्याचा मला मनस्वी आनंद आहे.
कार्यक्रमाला खजिनदार अशोक साखला, ट्रस्टचे उपाध्यक्ष आनंद बागमार, सहसचिव राहुल जैन-देढिया, विश्वस्त कांतीलाल पवार, बेबीलाल संचेती, सुरेश पाटील, जयप्रकाश जातेगावकर, रवींद्र गोठी, ललित मोदी, अरुणकुमार मुनोत, गौतम हिरण, प्रितिष छाजेड, नंदलाल पारख, संपतलाल पुंगलिया, चंद्रकांत पारख, महेश लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सोहनलाल भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मीकांत पाठक यांनी केले. आभार शशिकांत पारख यांनी मानले.
प्रत्येक विभागाला मान्यवरांची भेट
सोहळ्यापूर्वी चेअरमन भंडारी व सचिव पारख यांनी प्रकाश धारिवाल व गडकरी यांचा सत्कार केला. गडकरी यांच्या हस्ते प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल कार्डिअॅक केअर सेंटरचे फित कापून उद््घाटन करण्यात आले. या संपूर्ण सेंटरमधील दालनांची आणि यंत्रणांची सविस्तर माहिती गडकरी व धारिवाल परिवाराने पारख यांच्याकडून घेतली त्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. विशेष म्हणजे धारिवाल परिवाराने कार्यक्रमापूर्वी येऊन तब्बल दीड तास संपूर्ण हॉस्पिटलची माहिती घेतली. येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतानाच प्रत्येक विभागाची माहिती घेत समाधान व्यक्त केले.
ध्वजाचे मानकरी गवळींचा सत्कार
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तश्रुंगी गडाच्या शिखरावर किर्ती ध्वज लावण्याची परंपरा तब्बल ५०० वर्षांची आहे. हा ध्वज लावणाऱ्या लक्ष्मण गवळी यांना ट्रस्टच्या वतीने विशेष निमंत्रित करण्यात आले होते. नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गवळी यांचा सत्कार करण्यात आला.


