घरमहाराष्ट्रनाशिकहिरामण खोसकरांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाच्या दुबळेपणात भर?

हिरामण खोसकरांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाच्या दुबळेपणात भर?

Subscribe

10 वर्षांपासून इंदिरा काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय असणारे तालुक्यातील कार्यकर्ते निर्मला गावित यांच्याशी निष्ठा ठेवून भगवे झाले आहेत. पक्षांतरामुळे इंदिरा काँग्रेसची दोन्ही तालुक्यात दैना उडालेली आहे. या परिस्थितीत पक्ष नेस्तनाबूत झाला असूनही, प्रबळ असल्याचा मोजके लोक आव आणत आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत स्वतः मतदारसंघाबाहेरील असतानाही उमेदवारीवर दावा केला आहे.गेल्या महिन्यापासून निर्मला गावित यांच्याविरोधात स्थानिकच आमदार हवा या मुद्याला खोसकरांकडून बगल दिल्याची चर्चा सुरू आहे. हिरामण खोसकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने गावित यांच्या विरोधकांची दैना उडाल्याचे मानले जात आहे. यामुळे स्थानिक बाहेरचा मुद्दा पडला मागे पडल्याचे चित्र आहे.

मुळातच काँग्रेसमध्ये विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रवेश करणारे हिरामण खोसकर यांचे गाव नाशिक तालुक्यातील नाईकवाडी आहे. हिरामण खोसकर व त्यांच्या स्नुषा अपर्णा खोसकर हे दोघेही नेतृत्व करणार्‍या जिल्हा परिषदेचे मतदार संघ देवळाली विधानसभा मतदार संघात येतात. खोसकर यांचे स्वतःचेही इगतपुरी विधानसभा मतदार संघात मतदानसुध्दा नसल्याने ते तांत्रिकदृष्ठ्या बाहेरचेच असल्याने काँग्रेस पुन्हा मतदारसंघाबाहेरीलच उमेदवार देणार का, असा सवाल सर्व सामान्य मतदार विचारत आहे.

- Advertisement -

प्रबळ संभाव्य उमेदवार काशीनाथ मेंगाळ, शिवराम झोले यांना गावित व खोसकर यांचा इतर पक्षातील प्रवेश रुचलेला नाही. त्यामुळे त्यांना कोणता झेंडा घेऊ हाती या विचाराने ञस्त केले असल्याने ते कोणती भूमिका घेता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षांतराने इतर इच्छुक नेत्यांची मर्यादित ताकद फार काळ तग धरेल, असे वाटत नाही. मुळातच गावित यांच्याविरोधात एकवटलेले मूठभर विरोधक खोसकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने बॅकफुटवर आलेले आहेत. गावित यांच्या विरोधात विधानसभेसाठी एकच उमेदवार देण्याची विरोधकांची भुमिका मातीमोल ठरल्याचे चर्चिले जात आहे.
दरम्यान, गावितांचा अडसर दूर झाल्याने अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या उमेदवारीचे डोहाळे लागले असतांना खोसकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने ते नाराज झाले आहे.

एकंदरीत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार निर्मला गावित यांच्या सेना प्रवेशामुळे इंदिरा काँग्रेस नेस्तनाबूत झाली आहे. शिवसेनेचे आणि भाजपच्या इच्छुकांच्या अपेक्षांना सुरुंग लागून बंडखोर्‍यांची नांदी दिसू लागली आहे. बदललेल्या समिकरणांमुळे दोन्ही तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे. आगामी काही दिवसात ह्या घटनेमुळे राजकीय उलथापालथी वाढणार आहेत, हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -