एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचा १ डिसेंबरपासून बेमुदत संप

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निकषांनुसार वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ घेतला बेमुदत संपाचा निर्णय.

Eklahare_Power
एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र

नाशिक : येथील कंत्राटी कर्मचार्‍यांना शासनाच्या निकषांनुसार वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ आणि कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी १ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात कायम कर्मचार्‍यांसमवेत १२०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने वीज केंद्रात कार्यरत आहेत. तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असल्याने कर्मचार्‍यांची उपासमार होते. एकही ठेकेदार कंत्राटी कामगारांना नियमानुसार किमान वेतन देत नाही. ठेकेदार कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक करून तुटपुंज्या वेतनावर कामगारांना काम करण्यास भाग पाडत आहे. शासन नियमानुसार एकही ठेकेदार कामगारांचा पीएफ जमा करत नाही. काही ठेकेदार सहा वर्षापूर्वी भरलेल्या चलनाचा फोटो एडिट करून त्याचीच प्रिंट काढून बिलांना जोडून विभाग प्रमुखांशी संगनमत करून बिले पास करून घेत असल्याचा आरोप कंत्राटी कर्मचारी संघटनेने केला आहे.

कामगारांचे २०२० पासून २० टक्के वाढीव शुल्क व इतर भत्ते मंजूर होऊनही अद्याप कर्मचार्‍यांना अदा करण्यात ठेकेदार दिरंगाई करत आहे. ठेकेदार अनेक वर्षांपासून नियमबाह्य पद्धतीने काम करत असतानाही काही अधिकारी ठेकेदाराची मर्जी सांभाळत आहेत. मुख्य अभियंत्यांच्या आदेशालाही ते जुमानत नाहीत.कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा, अधिकार्‍यांनी ठेकेदाराचे हित न जोपासता कामगारांचा विचार करावा, शासनाने हस्तक्षेप करून कंत्राटी कर्मचार्‍यांची परवड थांबवावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

विद्युत केंद्रात कंत्राटदारांच्या हिताचीच कामे केली जातात. व्यवस्थापन कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांना न्याय मिळत नाही. अधिकार्‍यांनी याचा गांभीर्याने विचार करावा.
मच्छिंद्र जावरे, संघटक, वंचित बहुजन माथाडी कामगार संघटना, एकलहरे