घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिव्हिलमध्ये निकृष्ट वैद्यकीय उपकरणे; रुग्णांच्या जीवाशी खेळ

सिव्हिलमध्ये निकृष्ट वैद्यकीय उपकरणे; रुग्णांच्या जीवाशी खेळ

Subscribe

ऑपरेशन करताना स्क्रूसह मेटल्स चक्क तुटले; तक्रारीलाही ‘वाटाण्याच्या अक्षता’

नाशिक : जिल्हाभरातील गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान येत असताना प्रत्यक्षात अतिशय निकृष्ट दर्जाचे वैद्यकीय उपकरणे खरेदी करुन रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा ‘उद्योग’ जिल्हा रुग्णालयात सुरू असल्याचे पुढे आले आहे. सिव्हिलमधील एका शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णासाठी वापरलेले स्क्रू आणि मेटल्स चक्क तुटल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. परंतु, तरीही अद्याप अशा निकृष्ट दर्जाच्या साहित्य खरेदीची चौकशी कुणी करताना दिसत नाही.

नाशिक जिल्हा रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात येते. या पैशांतून रुग्णांकरिता लागणारी औषधे आणि उपकरणे यांची खरेदी केली जाते. कागदोपत्री निविदा काढून ब्रॅण्डेड कंपनीकडून ही खरेदी दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात उपकरणांचा दर्जा बघता संबंधित कंपनी ब्रॅण्डेड नसल्याचा संशय येतो.

- Advertisement -

खरेदी करताना दर्जासंदर्भातील सर्वच निकषांची पूर्तता केली जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून दर्शविले जाते. प्रत्यक्षात जेव्हा संबंधित वैद्यकीय उपकरणे वापरात येतात तेव्हा त्याचा सुमार दर्जा उघडकीस येतो. या दर्जाहीन उपकरणांमुळे रुग्णांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी वारंवार केली आहे. परंतु, तरीही परिस्थितीत अद्याप सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

काही दिवसांपूर्वी अस्थिरोग विभागात रुग्णांच्या ऑपरेशनसाठी वापरलेले स्क्रू आणि मेटल्स ऑपरेशनदरम्यान तुटल्याचा प्रकार घडला. संबंधित सर्जनने सिव्हिल प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार करुनही त्याची दखल घेतली नसल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. ऑपरेशन करताना अशा प्रकारच्या निकृष्ट उपकरणांचा वापर होत असेल आणि त्यात रुग्णाला काही इजा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

खरेदी केलेल्या उपकरणांची तपासणी गरजेची

जिल्हा रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेल्या सर्व उपकरणांची तपासणी होणे गरजेचे आहे. सदर उपकरणांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियेत वापरलेल्या निकष आणि पुरवठा यांचीही पडताळणी करणे आवश्यक आहे. निकृष्ट दर्जाच्या उपकरणांचा पुरवठा केल्याचे चौकशीअंती निदर्शनास आल्यास संबंधित पुरवठाधारकावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. ब्रॅण्डेड कंपनीची उपकरणे दाखवून निकृष्ट दर्जाच्या उपकरणांचा जेव्हा पुरवठा केला जातो तेव्हा कोट्यवधींचा ‘व्यवहार’ त्याआडून होत असल्याचाही संशय व्यक्त होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय साहित्य मिळाले नसल्याची तक्रार आली आहे. जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना दिले जाणारे वैद्यकीय साहित्य सदोष आहे की नाही, याची चौकशी केली जाईल. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधाडीया व पुरवठादाराशी सोमवारी याप्रकरणी चर्चा करणार आहे. : डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -