घरक्राइमइमारतीवरुन पडून ठेकेदारासह मजूर ठार; दोन वेगवेगळ्या घटनांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

इमारतीवरुन पडून ठेकेदारासह मजूर ठार; दोन वेगवेगळ्या घटनांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Subscribe

नाशिक : नवीन नाशिक येथील सावतानगर परिसरातील सूर्योदय कॉलनी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.४) घडली. राज नारायण राय (वय ३६, रा. जगतापवाडी, सातपूर, नाशिक) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

सावतानगर येथे सूर्योदय कॉलनीत पाचमजली निवासी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी कामावर असलेला बांधकाम कामगार राज राय सोमवारी सकाळी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करत होता. त्यावेळी तो तोल जाऊन खाली पडला. गंभीर दुखापतीमुळे राय यास त्याचा भाऊ संजीव कुमार यादव याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्राथमिक सुविधा न दिल्याने गेला जीव

बांधकाम सुरू असताना कामागरांना सुरक्षेसाठी सुरक्षापट्टा, हेल्मेट आणि संरक्षण जाळी पुरवण्याची गरज होती. मात्र, या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. सावतानगर येथे सुरू असलेल्या बहुमजली निवासी इमारतीच्या बांधकामाला सिडको प्रशासन, नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी आहे का? चार मजल्यापेक्षा जास्त मजल्यांची परवानगी आहे का ? ठेकेदाराकडे काम करणार्‍या कामगारांची कामगार आयुक्त कार्यालयात नोंद केलेली आहे का ? नोंद असेल तर नोंदणीकृत कामगारांना दिले जाणारे सुरक्षा किट या कामगारांना देण्यात आले होते का? चार मजल्यापेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामासाठी सुरक्षा जाळी बसविणे क्रमप्राप्त असतांना या ठिकाणी सुरक्षा जाळी नसतानाही काम कसे सुरू होते? उंचावर काम करतांना कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा पट्टा, हेल्मेट, यासारखी साधने वापरणे अनिवार्य असताना या प्राथमिक सुविधा नसल्याने झालेल्या अपघाताला जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तोल जाऊन खाली पडल्याने ठेकेदाराचा मृत्यू

पत्र्याचे शेड दुरुस्त करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अशोकस्तंभ परिसरातील वात्सल्य महिला आश्रमात सोमवारी (दि.४) घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पंकज रमेश वाघमारे (वय ३५, रा. महात्मा फुले शासकीय वसाहत, टिळकवाडी, शरणपूर रोड, नाशिक) असे मृत्यू झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकस्तंभ परिसरातील वात्सल्य महिला आश्रममध्ये तिसर्‍या मजल्यावरच्या टेरेसवर पत्र्याचे शेड दुरुस्त करत होते. पंकज वाघमारे यांच्यासह चार जण दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी वाघमारे तोल जाऊन खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ ज्योती भालेराव यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. वाघमारे यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. त्यामुळे तणावमय परिस्थिती निर्माण झाली होती. ही बाब सरकारवाडा पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने तणाव निवाळला.

- Advertisement -

नियम तुडवले जाताहेत पायदळी

कामगारांच्या सुरक्षेसाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम २००७ अंतर्गत नियम आहेत. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बांधकाम व्यावसायिकांकडूनही सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जातात. कामगारांच्या सुरक्षेची काळजी त्यांच्याकडून घेतली जात नाही. त्यामुळे कामगारांची सुरक्षितता नेहमीच दुर्लक्षित राहत असल्याचे यानिमित्ताने निदर्शनास आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -