घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रम्हसरूळ पोलीस ठाण्याचे रुपडे पालटले

म्हसरूळ पोलीस ठाण्याचे रुपडे पालटले

Subscribe

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नुतनीकरण झालेल्या कामाचे उद्घाटन

नाशिक : शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील पंचवटी भागातील म्हसरूळ पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी म्हणजेच सोमवारी (दि. १५ ऑगस्टला) सकाळी १० वाजता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ -१ अमोल तांबे, पंचवटी विभाग सहायक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.

पूर्वी संपूर्ण पंचवटी परिसराकरिता एकमेव पंचवटी पोलीस ठाणे होते. कालांतराने शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात पंचवटी पोलीस ठाण्याचे प्रशासकीयदृष्ट्या विभाजन करत नवीन दोन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. आडगाव गाव, मळे परिसर, नांदूर-मानूर या भागासाठी आडगाव पोलीस ठाणे तर आरटीओ कॉर्नर, म्हसरूळ, मखमलाबाद, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, चांभारलेणे या भागासाठी म्हसरूळ पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. १ जानेवारी २०१६ रोजी म्हसरूळ पोलीस ठाणे आरटीओ कॉर्नर येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या निवासी इमारतीत तयार करण्यात आले. त्याच इमारतीत दुसर्‍या मजल्यावर पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांचेदेखील कार्यालय सुरु करण्यात आले. या पोलीस ठाण्यात येण्या-जाण्यासाठीचा मार्ग हा दिंडोरी रोडकडून असल्याने नागरिकांना तक्रारी देण्यासाठी विलंब होत असे, तसेच बरेच नागरिक हे पंचवटी पोलीस ठाण्यातच तक्रार नोंदवण्यासाठी जात असल्याने पोलिसांकडून तक्रारींचा निपटारा होण्यासाठी जास्त कालावधी लागत होता. त्यामुळे आता पोलीस ठाण्याचे नुतनीकरण करताना आरटीओ कॉर्नर चौकातूनच पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार नागरिकांना लगेचच नजरेस पडेल असे बनवले आहे. हे नुतनीकरण करत असताना महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेसह सर्व विभागांच्या परवानग्या घेऊनच काम करण्यात आले असल्याचे सांगितले.

- Advertisement -

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे झालेले नुतनीकरण आणि प्रशस्त काम बघून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्यासह संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांचे कौतुक करत चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले. यावेळी मंचावर नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक अरुण पवार, गणेश गितेंसह सामाजिक कार्यकर्ते तसेच शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सहायक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी आभार प्रदर्शनाने केला.

नजरेस पडेल अशी वास्तू

पोलीस आयुक्तांनी म्हसरूळ पोलीस ठाणे भेटी दरम्यान हे पोलीस ठाणे नागरिकांना दिसेल, अशा पद्धतीने सुधारणा कारण्याबाबत पोलीस उपआयुक्त तांबे यांना सुचविले होते. त्याची दखल घेत पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करत परिसरातील नागरिकांना पोलीस ठाणे नजरेस पडेल असे काम झाले आहे. आरटीओ कॉर्नरकडील बाजूने पोलीस ठाण्याचे मुख्य प्रवेशद्वार बनवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -