घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'नाशिक बंद'ला संमिश्र प्रतिसाद; बाजारपेठेवर परिणाम

‘नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद; बाजारपेठेवर परिणाम

Subscribe

नाशिक : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचे निषेधार्थ मराठी संघटनांनी दिलेल्या नाशिक बंदच्या आवाहनाला शहरात अत्यावश्यक सेवा वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शहरातील बाजारपेठेवर परिणाम झाला. बंदमुळे बाजारपेठेत रविवारी सुटीचा दिवस असतानाही तुरळक स्वरुपात गर्दी दिसून आली. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जालना येथील घटनेचे पडसाद रविवारी (दि.२) नाशिकमध्येही उमटले. नाशिकमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या वतीने नाशिक बंदची हाक देण्यात आली. शहर परिसरात रविवारी (दि.३) ठिकठिकाणी मराठा संघटनांतर्फे नाशिक बंदचे आवाहन करण्यात आले. त्यास व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद दिला. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या आवारात मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी जालन्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात केला होता. बंदमुळे शहरात दिवसभर बाजारपेठेत तुरळक स्वरुपात ग्राहकांची गर्दी होती. संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटेनच्या माध्यमातून शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत त्यांचे पोस्टर फाडण्यात आले.

नाशिककरांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्य सरकारने जालन्याच्या पोलीस अधीक्षकांंचे निलंबन करावे. त्यांच्यासोबत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. आंदोलकांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत, या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा देऊन आत्मक्लेष करावा. समाजाची माफी मागावी अन्यथा शांत दिसणारा समाज आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही. याची किंमत सरकारला मोजावी लागेल. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा समाज म्हणून मराठा समाज सगळ्या घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेत असतो. परंतु, त्याच समाजावर जर कोणी अन्याय करायची हिंमत करत असेल तर जशास तसे उत्तरही समाजाकडून दिले जाईल. लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा, संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी : करण गायकर, संपर्कप्रमुख, स्वराज्य पक्ष

- Advertisement -

सिडकोतही मराठा आक्रमक

सिडकोतील  त्रिमूर्ती चौक, रायगड चौक, पवन नगर येथील दुकानदारांसह दिव्या अ‍ॅडलाब सिनेमागृह यांनी प्रतिसाद दिला. यावेळी हॉस्पिटल, रुग्णवाहिका, मेडिकल सुरु ठेवण्याचे मराठा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. नाशिक बंदला पोलीस प्रशासनाने सहकार्य केले. नवीन नाशिक सकल मराठा समाजाचे आशिष हिरे, योगेश गांगुर्डे, संजय भामरे, विजय पाटील, मुकेश शेवाळे, अभय पवार, उमेश चव्हाण, कृष्णा काळे,सुमित पगार, सागर पाटील, शुभम महाले,सागर जाधव, अर्जुन शिरसाठ, मनोज वाघ, विशाल पगार, प्रमोद पाटील ज्ञानेश्वर नरवडेंसह नविन नाशिक सकल मराठा समाजाचे पदधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -