Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र आई आर्त हाक देत राहिली, डोळ्यादेखत १३ वर्षीय आदित्यला दारणा नदीने आपल्या...

आई आर्त हाक देत राहिली, डोळ्यादेखत १३ वर्षीय आदित्यला दारणा नदीने आपल्या कवेत घेतले

Subscribe

नाशिक : आईच्या डोळ्यादेखत पोटच्या १३ वर्षीय मुलचा दारणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आदित्य वसंत नाठे (रा. गोंदे दुमाला, ता.इगतपुरी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आदित्य आई योगिता नाठेसोबत सोमवार (दि.२२) कपडे धुण्यासाठी दारणा नदीवर गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत चुलता,चुलती होती. उन्हाळी सुट्टी असल्याने गाडीत बसून तिघे भावंडेही नदीवर आली होती. मुकणे धरणाचे आवर्तन सोडण्यात आल्याने नदी तुडूंब भरुन वाहत आहे.

योगित नाठे यांच्यासह इतरांनी घरातील कपडे धुवायचे झाल्यानंतर गाडीही धुतली. आदित्य उन्हामुळे नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य नदीत बुडू लागला. आईने आरडाओरडा केला मात्र त्याठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. या घटनेनंतर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. अंधार पडल्याने रेस्क्यूत अडचण येत असल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी रेस्क्यू सुरु केल्यानंतर सकाळी सात वाजता त्याचा मृतदेह सापडला.

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील शिक्षक वसंत बबन नाठे यांचा एकुलता एक मुलगा आदित्य आईसोबत गेला असताना ही घटना घडली आहे. आदित्य हा आईबरोबर कपडे धुण्यासाठी दारणा नदीवर गेला होता. आई कपडे धुवत असताना आदित्य हा पायथ्याशी असलेल्या डोहात आंघोळीसाठी उतरला. आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य नदीत बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या चुलतभावांनी हे दृश्य पाहिले.

दरम्यान, त्यांनी कुटुंबियांना आवाज दिला तेव्हा, आदित्य गटांगळ्या खात होता. आईने लागलीच आदित्यकडे धाव घेतली. ते दृश्य पाहून तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिने आरडाओरडा केला, मात्र त्याठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते. डोळ्यांदेखत मुलगा नदीत बुडत असल्याचे पाहून आईने हंबरडा फोडला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात आदित्य खोलवर बुडाला होता. घटनेनंतर मालेगावहून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोंदे, अस्वली, नांदगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही पाण्याचा प्रवाह आणि अंधार पडत असल्याने रेस्क्यूत अडचण येत असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा रेस्क्यू सुरू केल्यानंतर सात वाजता आदित्यचा मृतदेह हाती लागला. शोकाकुल वातावरणात आदित्यवर गोंदे दुमाला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -