महापालिका सतर्क; झाकीर हुसेन, बिटकोत कोरोना सेंटरच्या हालचाली

नाशिक : नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यातच आता झिका व्हायरसचाही धोका निर्माण झाल्याने महापालिका अलर्ट झाली आहे. त्यामुळे नवीन बिटको रुग्णालय आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाबरोबरच आवश्यकता भासल्यास शहरातील कोविड सेंटरदेखील पूर्ववत करण्यासाठी हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

नाशिक शहरासह कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. दररोज ७० ते ८० रूग्ण आढळून येत आहेत. जिल्हयात सध्या ५७७ कोरोना रूग्ण आहे. यातील बहुतांश रूग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटेत आत्तापर्यंत दोन लाख ७३ हजार व्यक्ती बाधित झाल्या. प्रभावी लसीकरण केल्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार नाही असे चित्र असताना गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात झिका व्हायरसाचाही धोका निर्माण झाल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे जर कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रूग्णांना तातडीने उपचार मिळावे याकरीता पालिकेने उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालय आणि जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला विशेष कोविड रुग्णालयाचा दर्जा देत तपोवन, मेरी, समाजकल्याण कार्यालय, ठक्कर डोम, संभाजी स्टेडियम, क्रॉम्प्टन हॉल सावतानगर, अंबड येथे कोविड सेंटरची उभारणी केली होती. ऑक्सिजनच्या बफर स्टॉकची व्यवस्था करण्यासाठी ३२ ठिकाणी ऑक्सिजन युनिट बसविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय, नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय येथे कोरोना सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आली आहे.