मविप्र निवडणूक : माजी उपसभापतींसह सहा इच्छुक अपात्र

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत दाखल अर्जांची शुक्रवारी (दि.12) छाननी झाली. यात सहा अर्ज बाद ठरले. माजी उपसभापती नाना दळवी व गेल्या निवडणुकीतील ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप दळवी यांना यात दणका बसला. त्यामुळे आता एकूण 24 जागांसाठी 291 अर्ज पात्र ठरले. या अर्जांवर शनिवार व रविवार या दोन दिवसांत हरकत नोंदवता येणार आहे.

मविप्र निवडणुकीत अर्ज प्रक्रियेचा पहिला व महत्वाचा टप्पा पार पडला. उमेदवारी अर्जांची शुक्रवारी छाननी झाली. त्यानुसार सहा अर्ज बाद ठरले. नानाजी दळवी यांचा सटाणा तालुका सदस्यपदाचा अर्ज बाद झाला. अनुमोदक दोन उमेदवारांना अनुमोदक असल्याने हा अर्ज नामंजूर झाला. दरम्यान, दळवी यांचे उपाध्यक्ष, उपसभापती व चिटणीस या पदांसाठी असे तीन अर्ज दाखल असल्याने ते निवडणूक रिंगणात कायम आहेत. महिला सदस्यपदासाठी अर्ज केलेल्या उषा भामरे यांचा अर्ज अर्जासोबत शंभरच्या स्टँप पेपरवर परीशिष्ठ-ब च्या नमुन्यात प्रतिज्ञापत्र जोडलेले नसल्याने बाद झाला. दिलीप दळवी यांचा सटाणा तालुका सदस्यपदाचा अर्ज नामंजूर झालेला आहे. अनुमोदक दोन उमेदवारांना अनुमोदक असल्याने हे दोन्ही अर्ज नामंजूर झाले.

दरम्यान, त्यांचेही उपाध्यक्ष, उपसभापती व चिटणीस पदासाठी अर्ज दाखल असल्याने तेही निवडणूक रिंगणात कायम असतील. निवृत्ती घुमरे यांचा दिंडोरी-पेठ सदस्यत्वासाठीचा अर्ज नामंजूर झाला असून, सूचक हे सिन्नर तालुक्यातील व अनुमोदक हे नाशिक तालुक्यातील असल्याने अर्ज अपात्र ठरला. प्राथमिक व माध्यमिक सेवक सदस्यासाठी दाखल बाळासाहेब निफाडे यांचा अर्ज बाद झाला. मतदारयादीत मतदाराचे नाव बाळासाहेब नाठे व उमेदवारी अर्जात नाठेऐवजी निफाडे असे असल्याने हा अर्ज नामंजूर करण्यात आला. अर्ज बाद झालेल्या अर्जदारांना यासंदर्भात लवादाकडे अपीलासाठी 13 व 14 ऑगस्ट मुदत आहे. प्राप्त हरकतींवर लवादाच्या वतीने मंगळवारी (दि.16) दुपारी तीनपर्यंत सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल. त्याच दिवशी सायंकाळी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.