नाशिक बनले ‘उडता पंजाब’

वाट नशेची..; नशेसाठी औषधांचा बेसुमार वापर, रसायनांचीही निर्मिती

Drugs

मुंबई आणि ठाण्यातील इफेड्रीन बनवणारा कारखाना आणि अंमली पदार्थ पुरवणारे नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर या क्षेत्रातील माफियांनी आता नाशिक, मालेगाव आणि धुळ्यासारख्या लहान शहरांना आपले ‘सॉफ्ट टार्गेट’ बनवले आहे. दिंडोरी येथील क्लोरल हायड्रेटचा कारखान्यावरील मुंबई पोलिसांचा छापा, धुळ्यासह मालेगावात पकडलेला नशेच्या शेकडो गोळ्यांचा साठा आणि नाशिकच्या काठे गल्लीत पकडलेल्या निट्राझेपमच्या गोळ्यांच्या स्ट्रीप्स या सर्व घटनांच्या तपासातून ही बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स व तस्करांच्या माहितीतून पुढे आलेल्या मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा…

धार्मिक अधिष्ठान आणि थंड वातावरणामुळे प्रसिद्ध असलेले नाशिक शहर अंतरानेही मुंबई, पुणे आणि औरंगाबाद शहरांच्या जवळ आहे. त्यामुळेच अंमली पदार्थांची निर्मिती आणि वाहतुकीसाठी या क्षेत्रातील टोळ्यांनी गेल्या पाच वर्षांपासून नाशिकला आपले केंद्र बनवले आहे. केवळ गांजाच नव्हे तर अंमली रसायने आणि बंदी असलेल्या गोळ्यांचाही सर्रास काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क आणि पोलिसांचीही भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांची वाहतूक आणि निर्मितीसाठी अंडरवर्ल्डच्या टोळ्यांनी नाशिकला आपले हब बनवले आहे. मुंबईत तब्बल २५० ताडीच्या दुकानांना क्लोरल हायड्रेट या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा परिसरातील कारखान्यावर प्रसिद्ध पोलिस अधिकारी दया नायक यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात छापा टाकला. त्यानंतर स्थानिक पोलिसांना खडबडून जाग आली. अनेक महिन्यांपासून मुंबईकरांना ताडीच्या माध्यमातून क्लोरल हायड्रेट पाजले जात होते. ताडीमुळेच नशा येत असल्याचे समजून मुंबईकर शेकडो लिटर रसायन रिचवत होते. रसायन पुरवणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर या रसायन निर्मितीचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत येऊन ठेपले. केवळ क्लोरल हायड्रेटच नव्हे तर अल्फ्राझोलम, (कुत्ता गोली), डिसायक्लोमाईन (स्पॅस्मो), निट्राझेपम आणि सेन्सेड्रील (कफ सिरप) या औषधांचाही नाशिक, मालेगाव व धुळे मार्गे पुरवठा सुरू असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

अंमली पदार्थांची बाजारपेठ ही कोट्यवधी रुपयांची असल्याने, अनेक स्थानिक तरुणदेखील गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात आहेत. किंबहुना, या टोळ्या स्थानिक तरुणांना आर्थिक आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढतात. अनेकांना आपण नेमके काय पोहोचवतो आहोत, हेदेखील माहित नसते. तर काही आधीच नशेच्या आहारी गेलेले युवक हे पदार्थ मिळविण्यासाठी या धंद्यात सहभागी झाले आहेत. मालेगावात अशा तरुणांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून मालेगावात पोलिसांकडून वारंवार कारवाई होऊनदेखील कुत्ता गोलीची नशा उतरलेली नाही. त्यामुळेच सर्व प्रमुख यंत्रणांनीच संयुक्त मोहीम हाती घेऊन या धंद्याची पाळेमुळे खोदून काढण्याची वेळ आली आहे. अन्यथा, उत्तर महाराष्ट्र ‘उडता पंजाब’ व्हायला वेळ लागणार नाही.

सरकारी यंत्रणाच ‘गुंगीत’

रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा परस्पर मोठ्या प्रमाणावर नशेसाठी वापर होत असताना औषध निर्मात्या कंपन्या, घाऊक विक्रेते, पुरवठादार, मेडीकल्स यांचीही झाडाझडती होणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थिती लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन, प्रदूषण नियंत्रण विभाग आणि पोलिस हे तिनही विभाग स्वतःच गुंगीत आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रीपवर निर्मितीपासून ते बॅच नंबरपर्यंत सर्व माहिती असतानाही, या यंत्रणा गाफील असल्याने त्यांच्या कामगिरीबाबतच शंका घेतली जाते आहे.