Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र नाशिक ढोलचा डंका : मूळ परंपरा जपणारे "आम्ही नाशिककर वाद्यपथक"

नाशिक ढोलचा डंका : मूळ परंपरा जपणारे “आम्ही नाशिककर वाद्यपथक”

Subscribe

नाशिक : गणेशोत्सव, शिवजयंती, सण-उत्सव असो की लग्नसमारंभ.. जगभरात नाशिक ढोल वाजला नाही तर सण साजरा झाला असे वाटतच नाही. मांगल्याचे प्रतिक असलेले हे ढोल-ताशा वादन प्रत्येकाचे पाय थिरकायला लावते. त्यातच महाराष्ट्रातील ढोल-ताशा म्हटला की, प्रामुख्याने नाशिक ढोलपथकाचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. मूळ नाशिक ढोलची परंपरा जोपासणारे आम्ही नाशिककर ढोल पथकाचा जगभर नावलौकिक असल्याने वर्षभर विविध राज्यांमधून मागणी असते. कलाकाराला कोणतीही जात, धर्म नसतो. नाशिक ढोलचा आवाज सुरू होताच ऐकणारा थिरकल्याशिवाय राहत नाही, अशा शब्दांत आम्ही नाशिककर वाद्यपथकाचे (Amhi Nashikkar Dhol Pathak, Nashik) प्रमुख अख्तर अजिज शेख यांनी ‘माय महानगर’शी बोलताना आपला या वाटेवरचा प्रवास सांगितला.

शेख पुढे म्हणाले की, महाराष्ट्रासह भारतात आणि जगभरात नाशिक ढोलचे नाव आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही वादन नाशिकच्या नावासाठी करतो. महाराष्ट्रात नाशिक ढोल आणि पुणेरी ढोल असले तरी दोघांचे वादन वेगवेगळे आहे. पुणेरी ढोल पारंपरिक असून, वादक स्वत:साठी वादन करतात. पण, नाशिक ढोलवादन ऐकणार्‍यांना तालावर थिरकावल्याशिवाय राहत नाही. नाशिकढोलची स्थापना १९८० मध्ये वडील अजिज शेख यांनी केली. सुरुवातीला अवघे १५ वादक होते. आता १२० हून अधिक वादक आहेत. पारंपरिक पथकांमध्ये आवड म्हणून वादक असतात. पण नाशिकढोलमध्ये नाशिकच्या नावासह पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून वादक एकत्र आले आहेत. पूर्वीपेक्षा पथकामध्ये आता अधिक शिस्त आहे.

- Advertisement -

नाशिक ढोलपथकाने नाशिकसह देशभरातील अनेक कार्यक्रमाच्या प्रारंभी वादन केले आहे. त्याला आयोजकांसह उपस्थित नागरिकांनी दाद दिली आहे. दरवर्षी नाशिकमध्ये गणेशविसर्जन मिरवणुकीत मानाच्या साक्षी गणपती मंडळातर्फे वादन केले जाते. गणेशोत्सव व शिवजन्मोत्सवावेळी वादन केले जाते. पथकात चैताली घटमाले, जाफर शेख, फिरदोस शेख, आकाश खंदारे पूजा बरेलीकर, गौरी भागवत, जावेद शेख, तेजस्विनी जगताप, सलीम शेख, दीपक कांबळे, शुभम शेळके, रॉबिन बत्तीसे, लियाकत शेख, आरती जैन, अमित शेख हे आहेत. मोदी जॅकेट, झब्बा, फेटा, कोल्हापूरी चप्पल, सलवार व कुर्ता असा नाशिकढोलचा ड्रेसकोड आहे. गणेशभक्तांसाठी दरवर्षी वेगळी ताल, वादन केले जाते. यंदा ५ ढोलवर सलामी दिली जाणार आहे.

तिसरी पिढी करतेय वादन

नाशिक ढोलपथकाची १९८० मध्ये अजिज शेख यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा मुलगा अख्तर शेख यांनी नाशिक ढोलला सातासमुद्रापार नेला. विशेष म्हणजे अख्तर शेख यांचा मुलगा अजान शेखही दर्जेदार वादन करत असून, त्याचे वादन ऐकून उपस्थित गणेशभक्त व नागरिक ठेका धरत आहेत.

..असे आहे नाशिक ढोलचे वेगळेपण

  • पारंपरिक ढोलच्या तुलनेत नाशिक ढोलचा आवाज दुपटीने अधिक
  • नाशिक ढोलपथकात ढोलचे दोन्ही बाजूने वादन करतात
  • नाशिक ढोलचा ताल ऐकतानाच त्यावर मनसोक्त नृत्य करू शकतो.
  • पारंपरिक ढोलवर मात्र केवळ जागच्या जागीच थिरकता येते. त्याच्या ठेक्याची मजा घेता येते, नृत्य करता येत नाही
  • पारंपरिक ढोलला पाय लागल्यास ते अपवित्र मानले जाते. नाशिक ढोलवर उभे राहून करामती दाखविल्या जातात
  • नाशिक ढोलपथकाकडून दरवर्षी सलामी दिली जाते
  • कामधंदा सांभाळून अनेक वादक नाशिकच्या नावासाठी वादन करतात
  • पारंपरिक ढोल शास्त्रीय पद्धतीनेच वाजवतात. नाशिक ढोलला मात्र असे कोणतेही साचेबद्ध शास्त्र नाही

या राज्यांमध्ये नाशिक ढोलचे वादन

- Advertisement -

नाशिक ढोलचे केरळ, कर्नाटक, गोवा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात या राज्यांसह वापी, महाकालेश्वर, पठाणकोट, उदयपूर, उज्जैन, सांगलीमध्ये वादन करण्यात आले आहे.

नाशिक ढोलमध्ये ३५ ताल

नाशिक ढोलमध्ये नाशिक कावडी, मुंबई कावडी, भांगडा, धम्माल, राम लक्ष्मण, गरबा यासह ३५ ताल आहेत. प्रत्येक ताल वेगळी असल्याने पसंतीस उतरते.

- Advertisment -