कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना विनाहेल्मेट प्रवेश दिल्याने प्राचार्यांवर गुन्हा दाखल

नाशिक पोलीस आयुक्तांची कारवाई

नाशिक : नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी कडक हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. महाविद्यालयात आणि कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश दिल्याप्रकरणी एक प्राचार्य आणि मालमत्ता अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रशासकीय आणि निमप्रशासकीय कार्यालयांच्या प्रमुखांचे धाबे दणाणले आहे. येथून पुढे आधी कार्यालय प्रमुखांवर आणि नंतर दुचाकीचालकावर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी दिला आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अनेक कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकी चालकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळेच दंत महाविद्यालयाचे मालमत्ता अधिकारी अशोक हिरे आणि एचपीटी कॉलेजचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांच्याविरोधात पोलीस अधिनियम कलम 131 ब (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते.

त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर ‘नो हेल्मेट, नो पट्रोल’ मोहीम सुरू केली. त्यानंतर दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यांची परीक्षाही घेण्यात आली. शेवटचा उपाय म्हणून नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत.

8 नोव्हेंबरपासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता कडक कारवाई सुरू झाली आहे. दुचाकीचालकाने हेल्मेट घातले नाही आणि अशा व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिल्यास तेथील अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 (ब) (1) नुसार बाराशे रुपयांचा दंड किंवा आठ दिवसांचा तुरुंगावास भोगावा लागेल. अथवा गरज पडल्यास दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागतील, असे पोलीस आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्व आस्थापना प्रमुखांना वाहनतळ आणि प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पोलिसांचे भरारी पथक वेळोवेळी या भागात पाहणी
करणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापर करावा. हेल्मेटचा वापर वाढवण्यासाठी केलेले नियम चांगले आहेत. त्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, मात्र कारवाईचा अतिरेक करू नये.
– छगन भुजबळ, पालकमंत्री

कोरोना संसर्गामुळे महाविद्यालये बंद आहेत. परंतु परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात येत असतात. अर्ज भरणे आवश्यक असल्याने कदाचित सुरक्षारक्षक त्यांना रोखू शकला नसेल. या दरम्यान पोलीस आयुक्तांनी पाहणी केली असेल. यापुढे महाविद्यालयात याबाबत कठोर निर्बंध करण्यात येतील.

– व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य, एचपीटी महाविद्यालय