चारचाकी वाहनांसाठी आजपासून नवीन सिरीज

नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथे चारचाकी वाहनांसाठी आजपासून म्हणजेच मंगळवार (दि.२८) पासून ‘एम एच 15 एच वाय’ ही नवीन सिरीज सुरू करण्यात येत आहे. आपल्या वाहनाला आकर्षक अन् पंसतीचा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी विहित कार्यपद्धीनुसार आता प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूतर्ता करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे नाशिककर वाहनधारकांना केले आहे.

शासन प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, नागरिकांना चारचाकी वाहनांसाठी ‘एम एच 15 एच वाय’ या नवीन सिरीजनुसार आता आकर्षक नोंदणी क्रमांक मिळू शकेल. त्यासाठी शासन नियमानुसार ठराविक शुल्क आकारण्यात येणार आहे. आज पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि.२८) फक्त चारचाकी वाहनधारकांचेच अर्ज स्विकारण्यात येतील. यानंतर बुधवारपासून (दि. २९) चारचाकी वाहनधारकांसोबत इतर वाहनधारकांनादेखील अर्ज सादर करता येणार आहेत. पसंतीच्या नोंदणी क्रमांकांच्या शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टव्दारे भरणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा किंवा शेड्युल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांच्या नावाने काढायचा असून, अर्जासोबत आपल्या पॅनकार्डची साक्षांकीत प्रत जोडावी लागणार आहे.

आकर्षक क्रमांकासाठीच्या शुल्काबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार आता आजपासून क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

 

लिलावात लागणार बोली, असा घ्या सहभाग..

अर्जदराने राखून ठेवलेला पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थतीत बदलून किंवा रद्द करता येणार नाही.
राखीव पसंती क्रमांक कोणत्याही परिस्थितीत दुसर्‍या व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे हस्तांतरीत होणार नाही.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील सूचना फलकावर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येईल. ज्या अर्जदारांचा क्रमांक लिलावात असेल, त्यांनी लिलावात सहभागासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. २९) दुपारी ४ वाजेपर्यंत शुल्काच्या रकमेच्या डिमांड ड्राफ्टव्यतिरिक्त कोणत्याही बोलीच्या रक्कमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावयाचा आहे. ज्या अर्जदारांच्या बोलीच्या रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट जास्त रक्कमेचा असेल अशा अर्जदाराला पसंती क्रमांक मिळेल. मात्र, एकापेक्षा जास्त डिमांड ड्राफ्ट सादर करणार्‍याचा अर्ज रद्द होईल.

 

आकर्षक नोंदणी क्रमांक हवाय? तर मग जाणून घ्या ही पद्धती..

आपल्या पसंतीचा आकर्षक नोंदणी क्रमांक हवा असल्यास २८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २:३० वाजे दरम्यान कार्यालयात अर्ज जमा करणे बंधनकारक आहे. अलिकडच्या काळात पसंतीचा क्रमांक मिळवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरटीओकडून यासाठी विशिष्ट प्रक्रिया ठरवून देण्यात आली आहे. आकर्षक क्रमांक प्राप्त करण्याबाबतच्या अर्जदारांच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, वीजबिल, घरपट्टी यापैकी एक साक्षांकित छायांकित प्रत, तसेत अर्जदाराचे पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र (मतदार कार्ड), पासपोर्ट कार्ड यापैकी एक साक्षांकित छायांकीत प्रत आज निर्धारित वेळेत सादर करणे आवश्यक आहे.