घरमहाराष्ट्रनाशिकपगडी निर्मिती उद्योगाची गल्ली "पगडबंद लेन"

पगडी निर्मिती उद्योगाची गल्ली “पगडबंद लेन”

Subscribe

दहीपुलाकडील उत्तरेकडचा रस्ता पगडबंद लेन नाशिकमधील नामवंत गल्ली आहे. अनेक कारणांनी गाजलेली. दहीपूल चौकाकडून सराफ बाजाराकडे उत्तरेकडे जाणारा रस्ता पगडबंद लेन. पेशवेकाळात नाशिकचा उत्कर्ष झाला. त्याकाळी विशेषत: सरकारी दरबारी मानकरी, वेदशास्त्रनिपुण पंडित, वकील, तत्सम मंडळी प्रामुख्याने पगडी घालीत. पगडी निर्मितीचे उद्योजक व विक्रेते यांचा परिसर म्हणून या गल्लीची ओळख पगडबंद लेन या नावाने होती. स्थानिक मंडळी व संस्थांच्या अथक प्रयत्नांद्वारे काय काय स्थित्यंतरे व अघटित घडले त्यांचा कालपट म्हणजे शास्त्रीय संशोधनासारखा हेतू न ठेवता त्याचा केवळ स्मृती जागृत करणे, हा उद्देश आहे.

या गल्लीतील एका सुपुत्राच्या कर्तबगारीने ही गल्ली कृतार्थ झालीच. परंतु, भारताच्या क्रांतिकारकांच्या इतिहासातील अपूर्व व त्याग व बलिदानाची पावनखिंड ठरली. मित्रमेळा या संस्थेचे व अभिनव भारत मंदिराचे सदस्य जॅक्सन वधातील फाशीची शिक्षा झालेले हुतात्मा कृष्णा कर्वे, याच गल्लीतील रहिवासी होते अवघ्या २३ वर्षांच्या कोवळ्या वयाच्या, उच्चविद्याविभूषित अण्णा कर्वे यांची पराक्रमी गाथा आजही अंगावर रोमांच उभी करणारी आहे. गणू न्हावी व गणपतराव मगर हे क्रांतिकारी कार्यकर्तेदेखील याच गल्लीत राहत असत. नाशिकच्या यशवंत व्यायामशाळा व वसंत व्याख्यानमाला वीर बापुराव गायधनी या ख्यातकीर्त संस्थेचे अध्वर्यु, काँग्रेसचे नेते डॉ. आप्पासाहेब द. ब. खाडिलकर यांचा खाडिलकर वाडा, त्यांचे बंधू पॅथॉलॉजिस्ट व नामांकित डॉ. चिंतूकाका खाडिलकर. आप्पासाहेबांच्या पत्नी इंदूताई खाडिलकर या अनाथ आश्रमाच्या प्रमुख संचालिका होत्या. अमृत, रसरंगचे कार्यालय व भारत प्रेस खाडिलकर वाड्यात होते. याच वाड्यातील नावाजलेले मगर बत्तीवाले देवीदास व दत्तोपंत तांबोळी, डॉ. यादवराव जोशी यांचा आणि लोकमान्य व लोकरंजकचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी या परोपकारी वृत्तीच्या डॉक्टरांचा दवाखाना पगडबंद लेन येथे होता.

- Advertisement -

नाशिक भूषण म्हणून प्रसिद्ध असलेले किसनराव नथूजी भोसले यांचे चहाचे दुकान प्रसिद्ध आहे. चहाची तुलना अमृततुल्य चहा या नावाने होत असे. त्यांचे पुत्र प्रसिध्द राजकीय व सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ मंगेशकर स्मृती मंडळाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक वसंतराव भोसले, बबनराव व हिरामणराव भोसले यांनी वडिलांची परंपरा पुढे चालविली व नव्या पिढीतील भोसले परिवाराने ज्वेलर्स सराफी क्षेत्रात चांगला लौकिक प्राप्त केला आहे. सामाजिक सेवेचा वारसा निरलसपणे चालविणार्‍या पाटील बंधूंचा पाटीलवाडा, प्रसिद्ध सराफ अंबेकर, मित्रविहार या संस्थेचे पदाधिकारी बाळासाहेब अंबेकर, मुरलीधर व बबन दौंडकर, मैंद बंधू हीदेखील नाशिक शहरातील प्रसिद्ध मंडळी होती. महाजनांच्या वाड्यातील मंडप डेकोरेटर्स निवृत्तीराव ठाकरे, प्रसिध्द क्रीडापटू सुरेश बकरे मांगलिक कार्यातील साहित्य पुरविण्यात अग्रगण्य होते.
नाशिक नगरपालिकेकडील वसुलीसाठी नगराध्यक्षांच्या खुर्चीवर जप्ती आणण्याची बकरे यांनी केलेली कायदेशीर लढाई त्या काळी गाजली होती.

नाशिकचे प्रसिद्ध खेडकर शास्त्री यांचा आणि कवी आनंद जोर्वेकर यांचे आजोळ असलेला खेडकर वाडा, नाशिकच्या राजमहालाचे संचालक मधुकरराव अदमाने यांचे आजोळ असलेला राजेंद्रवाडा, मुसळगावकरांच्या वाड्यातील चव्हाण, जाखडी, मुर्तडक, महाजनांची प्रसिध्द कोळशाची वखार, नंदवाणी वलेच्या या प्रसिध्द बेकर्‍या येथे होत्या. महसूल खात्यातील कर्तव्यदक्ष सेवेने सन्मानित झालेले येवला व सातपूर नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी वासुदेवराव मराठे व प्रसिद्ध कुस्तीगीर सावरे यांचे वास्तव्य या विभागात होते.

- Advertisement -

महाजनवाड्यात प्रथमत: शिवसेनेचा गणेशोत्सव झाला होता. याच वाड्यातील माजी नगरसेवक काँग्रेसचे कार्यकर्ते सिनेकलावंत शिवाजीराव साळुंके यांचे टेलरिंग, उबाळकर यांचे ’क्षुधाशांती’ हे चहासाठी प्रसिद्ध असलेले व जाखडी यांचे किराणा दुकान प्रसिद्ध होते. पेंडसेवाडा हा नाशिक शहरातील प्रसिद्ध वाडा. अनेक सामाजिक, साहित्य, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वास्तव्याने संपन्न होता. सुमारे ७० वर्षांपासून वास्तव्य असलेल्या कचोले कटंबियांनी अत्यंत मौलिक कामगिरी बजावली आहे. या परिवारातील मधुकर अच्युत तथा अप्पासाहेब कचोळे हे नाशिकमधील कायदेतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असत. त्यांचे पुत्र प्रसाद कचोळे हेदेखील नामवंत वकील. प्रभाकर अच्युत कचोळे महाराष्ट्र बँकेचे सहायक अधिकारी होते. नाशिकमधील भारतीय मजदूर संघाचे संस्थापक व भगवंतराव हॉटेलमध्ये विचारवंत मंडळींच्या बैठकीतील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. विमलबाई कचोळे या कार्यकर्त्यांच्या अन्नपूर्णा होत्या. कार्यकर्त्यांच्या जेवणाचे डबे देऊन त्या सहकार्य करीत असत. भालचंद्रराव कचोळे राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नावाजलेले अधिकारी व कामगारांचे मार्गदर्शक होते. त्यांचे पुत्र अ‍ॅड. संतोष कचोळे हौशी रंगभूमीवरील नाट्यकलावंत आहेत.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -