घरताज्या घडामोडीपंचवटीचे योगेश कापसे पुरवतात गरजुंना मोफत जेवण

पंचवटीचे योगेश कापसे पुरवतात गरजुंना मोफत जेवण

Subscribe

रस्त्यावरील नागरीक, वयोवृध्दांना घरपोहोच सेवा

नाशिक : केटरिंग आणि मेसचा व्यवसाय चालवणारे योगेश कापसे हे लॉकडाऊनच्या काळात गरजूंना घरपोहोच मोफत जेवण देत आहेत. पंचवटी, गंगापूर रोड व कॉलेजरोड येथील व्यक्तिंना गेल्या 14 दिवसांपासून ते ही सेवा पुरवतात. दिवसाला साधारणत: 40 ते 50 व्यक्तींना दोन वेळचे जेवण ते पोहोचवत असल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. संचारबंदी लागू होण्यापूर्वी योगेश कापसे हे आपला मेसचा व्यवसाय चालवत होते. कॉलेज रोड व गंगापुर रोड येथील विद्यार्थ्यांना मेसचे डबे पोहोचवण्याचे त्यांचा नित्यनियमित व्यवसाय आहे. लॉकडाऊनची घोषणा होताच बरेच लोक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. त्यामुळे त्यांनाही जेवणाची आवश्यकता भासू लागली. जेवणाचे डबे पोहोचवत असताना कापसे यांच्या लक्षात आले की, अनेक वयोवृध्द, रस्त्यांवरील व्यक्तींना अन्नाची उणिव भासत आहे. त्यांनी फेसबुकद्वारे गरजू व्यक्तींना आवाहन करत मोफत डबे पोहोचवण्याची सुविधा सुरु केली. विद्यार्थी, वयोवृध्द व्यक्तींना नियमित डबे पोहोचवण्यासोबतच ते इतर व्यक्तींना पोळी व भाजी देऊ लागले. बहुतेक व्यक्तींकडे पैसे आहेत; परंतु, घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. वयामुळे जाऊन खरेदी करण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तींना त्यांनी घरपोहोच डबे दिले.

दिंडोरी रोडवरील तलाठी कॉलनी येथील रहिवासी असलेले कापसे हे सकाळी साडेसात वाजेला उठतात. त्यांची पत्नी अश्विनी, आई संगिता व मावशी या कामात त्यांना मदत करतात. साधारणत: चार दिवसांचा भाजीपाला एकाच वेळी घेतल्यानंतर दोन वेळा वेगवेगळा स्वयंपाक केला जातो. यात संपूर्ण कापसे कुटुंब सामाजिक अंतर रखत सहभागी होते. सकाळी 11 वाजता डबे पोहोचवण्यास सुरुवात होते. पंचवटी, गंगापूर रोड व कॉलेज रोड या भागांत सुमारे दोन वाजेपर्यंत हे डबे पोहोचवले जातात. यात भाजी, पोळी दिली जाते. रस्त्यावरील नागरीकांना एकाच वेळी सहा पोळ्या व दोन वेळा जेवण करता येईल, अशा स्वरुपात भाजी दिली जाते. त्यामुळे दिवसभराच्या जेवणाचा प्रश्न सूटतो. पुन्हा दुसर्‍या दिवशी या नागरीकांना नवीन जेवण दिले जाते. शासन व सामजिक संघटना या कार्यात उतरल्यामुळे आता रस्त्यावरील नागरीकांच्या जेवणाचा प्रश्न बर्‍यापैकी मिटला आहे. मात्र, अडकून पडलेले विद्यार्थी, वयोवृध्द व्यक्तींना जेवणाची सुविधा आजही पुरवली जात असल्याचे योगेश कापसे सांगतात.

डबे पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून पास मिळवला आहे. परंतु, धोका वाढत असल्याने आता काळजी घेण्याची गरज आहे. नियमित डब्यांशिवाय आता दुसर्‍या भागात जात नाही. गंगापुर रोड, कॉलेजरोडवरील गरजूंना मोफत डबा हवा असल्यास त्यांनी 9850490790 या क्रमांकावर संपर्क साधावा.
-योगेश कापसे,

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -