सटाणा मर्चट बँकेच्या मतमोजणीला स्थगिती

श्री सिद्धिविनायक पॅनलचे मयूर अलई यांच्या आक्षेपानंतर पुणे निवडणूक प्रादेशिक कार्यालयाचे आदेश

सटाणा : समको बँकेच्या निवडणुकीच्या केंद्र क्रमांक चारच्या बूथ क्रमांक दोनवर श्री सिद्धिविनायक पॅनलचे उमेदवार मयूर अलई यांनी आक्षेप घेतल्याने सोमवारी (दि. २०) सकाळी सुरू होणार्‍या मतमोजणीला पुणे येथील निवडणूक प्रादेशिक कार्यालयाने स्थगिती दिली असून येत्या रविवार (दि.२६) रोजी सकाळी त्या मतदान केंद्रावर फेरमतदान करून सोमवारी (दि.२७) रोजी संपूर्ण मतमोजणी करण्यात यावी, तोपर्यंत मतमोजणी करू नये असे आदेश पारित केले आहेत.

मतदान केंद्र क्रमांक चारच्या बूथ क्रमांक दोनवर मतदान प्रकियेत घोळ झाल्याचा आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने संबंधित केंद्र प्रमुखास विचाराणा केल्यानंतर अनुसुचित जाती जमातीच्या आठ मत पत्रिका जास्त तर ओबीसी आठ मतपत्रिका कमी दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर या केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून ज्या अधिकार्यांनी कामकाज पाहिले त्यानी देखील झालेली चूक मान्य केली आहे. मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुजय पोटे कामकाज पाहत आहेत त्यांनी याबाबतचा अहवाल निवडणूक प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्याकडे पाठविला असून त्यांचा अभिप्राय प्राप्त होत नाहीं तो पर्यंत मतमोजणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रिया खोळंबल्याने उमेदवार व त्यांचे समर्थक मतदान केंद्राबाहेर गर्दी करून आहेत. मतमोजणी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी होत होती पन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुणे येथून जो पर्यंत आदेश येत नाही तो पर्यंत मतमोजणी होणार नाही असा पवित्रा घेतला होता. संध्याकाळी उशिरा पुणे येथील निवडणूक प्रादेशिक कार्यालयाने येत्या रविवारी त्या मतदान केंद्रावर पुन्हा फेर निवडणूक करावी व सोमवारी संपुर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश दिल्याने दोन्ही पॅनल प्रमुखांनी शांततेचा मार्ग पत्करला आहे. आता पुन्हा सर्वांचा नजरा रविवारकडे लागल्या आहेत.