अंबडच्या फरार लाचखोर पीएसआयसह हवालदाराला अटक

संशयित आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी घेतली लाच, सापळ्याचा संशय येताच दोघे पोलीस झाले होते फरार

अंबडच्या फरार लाचखोर पीएसआयसह हवालदाराला अटक

नाशिक – संशयित आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी महिलेकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अंबड पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) कैलास आनंदा सोनवणे (वय ५७, रा. खांडे मळा, सिडको, नाशिक) व पोलीस हवालदार दीपक बालकृष्ण वाणी (वय ३२, रा. उत्तम नगर, सिडको, नाशिक) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अँटी करप्शन ब्युरो) बुधवारी (दि.२४) अटक केली.

तक्रारदार महिलेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, पोलीस ठाण्यात जामीनप्रक्रिया पूर्ण करुन देण्यासाठी दोघांनी महिलेकडे मंगळवारी (दि.२३) २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती लाचेपोटी १० हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने शहानिशा करुन सापळा रचला.

पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे यांनी महिलेकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. सापळ्याचा संशय येताच दोघेही लाचखोर पोलीस फरार झालेल होते. त्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून बुधवारी (दि.२४) दोघांना अटक केली. या घटनेमुळे वारंवार बदनामीला सामोरे जाणाऱ्या अंबड पोलिसांचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.