घरमहाराष्ट्रनाशिकमेळघाटच्या राख्या बांधणार सातासमुद्रापार बंध

मेळघाटच्या राख्या बांधणार सातासमुद्रापार बंध

Subscribe

केंद्राच्या आयसीसीआरची मदत; यंदा नाशिकसह चार शहरांमध्ये राखी महोत्सव

मेळघाटातील आदीवासींनी तयार केलेल्या सुबक इको-फ्रेंडली राख्यांची परदेशातील भारतीयांनाही भुरळ पडली आहे. या बांबूच्या राख्यांना परदेशात मागणी वाढल्याने केंद्र सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) संस्थेतर्फे या राख्या जगभरातील ३५ देशांत पाठवल्या जाणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रातर्फे गेल्या पाच वर्षांपासून बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या जात आहेत. मेळघाटची नवी ओळख म्हणून पुढे येत असलेल्या बांबू राखीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या सहकार्याने उत्तर महाराष्ट्रात नाशिक, विदर्भात नागपूर, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि पुणे अशा चार मोठ्या शहरांमध्ये ‘राखी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात बांबूपासून निर्मिती केलेल्या वेगवेगळ्या आकार आणि प्रकारांतील राख्या विक्रीसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती संपूर्ण बांबू केंद्राचे संचालक सुनील देशपांडे यांनी दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून मेळघाटच्या कारागिरांचे कौशल्यही राज्यातील नागरिकांसमोर आणले जाणार आहे. सुमारे सव्वालाख राख्या आणि ५० हजार राखी बनविण्याच्या किटस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यातील एक हजार शाळांमध्ये संपर्क करून त्यांना या किट्स पुरविण्यात येतील. अंदाजे दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत बांबू राखीची संकल्पना पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. धारणी जिल्ह्यातील लवादा येथेच या राखी बनविण्याचे पूर्ण काम करण्यात आले आहे. यंदा राखी निर्मितीचे प्रमाण वाढवून त्या परदेशात पाठवण्याचेही नियोजन सुरू आहे. आयसीसीआर संस्थेच्या माध्यमातून त्या परदेशात पोहोचवण्यात येतील.

- Advertisement -

राखीतून अंकुरणार रोप

बाजारात विक्रीसाठी असलेल्या इतर राख्या सुंदर दिसण्यासाठी त्यावर चकाकणारे मणी लावलेले असतात. मात्र, मेळघाटातील या राख्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. या राख्यांमध्ये बीज टाकलेले आहे. त्यामुळे ही राखी खराब झाल्यावर कुठे फेकली तर या राखीत टाकलेले बीज जमिनीत रोवले जाते. त्यानंतर त्याचे झाड तयार होते.

रोजगार निर्मितीचे केंद्र

लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राने गेल्या अठरा वर्षांपासून मेळघाटातील ग्रामीण, आदिवासी समुदायासोबत राहून तेथील वनसंपदा व मनुष्यबळाचा अभ्यास केला. यात वनसंपदेवर आधारित लघु उद्योग सुरू केल्यास स्थानिक कारागिरांना रोजगार मिळू शकते, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले. त्यातूनच राखी तयार करण्याची संकल्पना पुढे आली. मेळघाटमधील सात गावांमधील सुमारे ५० कारागिरांनी तब्बल सव्वालाख बांबू राख्या तयार केल्या आहेत. या राख्या पर्यावरणपूरक आहे. प्लास्टिक, थर्माकोल वा इतर वस्तूंपासून निर्मित राख्यांमुळे पर्यावरणाची हानी होते. या राख्यांमुळे आदिवासींना रोजगारही उपलब्ध होतो.

- Advertisement -

राख्यांच्या प्रचारासाठी मोदींचे छायाचित्र

मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या हातावर पर्यावरणपूर्वक राखीचे सृष्टीबंधन बांधण्यात आले होते. त्यामुळे या राख्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी राख्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मोदींचे छायाचित्र वापरून राखी विक्रीचे पोस्टर तयार करण्यात येणार असून, या राख्या तयार करणार्‍या कोरकू आदिवासी महिलांची नावेच त्यांना देण्यात आली आहेत.

महिला कारागिरांचे राख्यांना नावे

सुमारे ५० महिला आणि पुरुष कारागिरांनी तीन महिन्यांच्या मेहनतीतून सव्वालाख राख्या तयार केल्या आहेत. या राख्या ज्यांनी तयार केल्या, त्या महिला कारागिरांचीच नावे राख्यांना देण्यात आली आहेत. राखी जर पुरुष कारागिराने तयार केली असेल तर त्याच्या पत्नीचे नाव या राखीला देण्यात आले आहे. आदिवासी महिलांचा सन्मान करण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -