घरमहाराष्ट्रनाशिकधक्कादायक : चंडिकापूरला जन्म दाखल्यात मृत्यूची नोंद

धक्कादायक : चंडिकापूरला जन्म दाखल्यात मृत्यूची नोंद

Subscribe

पालकांची तक्रार

वणी : दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर येथील एका मुलाच्या जन्म दाखल्यात जन्माऐवजी मृत्यूची नोंद असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकाराने पालकांनी संताप व्यक्त करत संबंधित ग्रामसेविकेवर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. वणी येथील रहिवाशी रियाज अमीनखान मुल्ला यांचा मुलगा अली रियाज खान याचा जन्म चंडिकापूर येथे झाला असून, चंडिकापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्याच्या जन्माची नोंद केली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलाचा जन्म दाखला घेण्यासाठी चंडिकापूर ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दिला असता त्यांना सहा-सात दिवस ग्रामसेविकेनी दाखल्यासाठी चकरा मारायला लावल्या.

त्यानंतर तक्रारदार यांना संबंधित ग्रामसेविकेने त्यांच्या सही व निबंधकांच्या असलेल्या शिक्क्यासह जन्मदाखला घेतला. परंतु मुलगा हयात असताना देखील जन्मदाखल्यात जन्माऐवजी मृत्यूची नोंद झाल्याचे निदर्शनास आल्याने पालकांनी संताप व्यक्त करत गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देवून कार्यवाहिची मागणी केली आहे. मुलगा अली रियाज खान हा वणी येथील महाविद्यालयात सध्या शिक्षण घेत आहे. तो हयात असून देखील ग्रामसेविकेने आकसापोटी, काहीतरी आर्थिक स्वार्थासाठी मुलाचा बनावट मृत्यूचा दाखला बनविल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मेढे यांना निवेदन देण्यात आले असून बनावट मृत्यूच्या दाखल्यात असे नमूद आहे की ‘प्रमाणित करण्यात येत आहे की खालील माहिती मृत्यूच्या मूळ अभिलेखाच्या नोंदवहीतून घेण्यात आली आहे जे कि स्थानिक क्षेत्र नाव चंडिकापूर, ता. दिंडोरी, जि. नाशिक, महाराष्ट्र राज्याच्या नोंदवहीत उल्लेख आहे’ असे सदर बनावट मृत्यूच्या दाखल्यात नमूद आहे. तसेच मृताचे पूर्ण नाव अली रियाज खान मृत्यू दि. १/७/२००५ असे नमूद असून नोंद क्रमांक 10 असा मृत्यूच्या दाखल्यात स्पष्ट उल्लेख आहे.’ चंडिकापूर येथील ग्रामसेविकेने बनावट मृत्यूचा दाखला बनवला असून त्यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा दिंडोरी न्यायालय यांच्याकडे धाव घ्यावी लागेल असे तक्रार अर्जात तक्रारदारांनी निवेदनात म्हटले आहे.

माझा मुलगा अली खान हा हयात असून देखील तो सध्या वणी येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मी त्याचा जन्म दाखला मागितला असून त्यांनी मला दिनांक २७/१२/२०११  रोजी जन्म दाखला न देता माझ्या मुलाचा मृत्यू दाखला दिला. याबाबत मी गटविकास अधिकारी मेढे यांच्याकडे तक्रार केली. जर संबंधित ग्रामसेविकेवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन निलंबनाची कारवाई नाही केली तर सर्वांचे संगनमत असल्याचे समजून मी कोर्टात सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई करेल. – रियाज अमीनखान मुल्ला, तक्रारदार

संबंधित चंडिकापूर येथील ग्रामसेविकेच्या विरोधात माझ्याकडे रियाजखान मुल्ला यांची लेखी तक्रार आली असून त्यांचा मुलगा हयात असून मृत्यूचा दाखला देण्यात आल्याची तक्रार पंचायत समितीकडे आलेली आहे. संबंधित ग्रामसेविका यांना नियमाने नोटीस काढण्यास सांगितलेली आहे. त्या नोटीसचा लेखी खुलासा आल्यानंतर कायदेशीर कारवाई होण्यासाठी वरिष्ठ स्तरावर तो अहवाल पाठविण्यात येईल व वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. – विनोद मेढे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती दिंडोरी

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -