घरमहाराष्ट्रनाशिकछोट्या हातांची मोठी जिद्द, साकारले करिअरचे स्वप्न

छोट्या हातांची मोठी जिद्द, साकारले करिअरचे स्वप्न

Subscribe

‘मेट’च्या पदविका अभ्यासक्रमा अंतिम वर्षात शिकणार्‍या तबिशची कहाणी; संगणकशास्त्रात व्हायचेय अभियंता

जस जसे वय वाढत जाते, तसेच शारीरिक अवयवांची वाढ होते. मात्र, याला अपवाद ठरलेल्या नाशिकच्या तबिश सादीक शेख याचे दोन्ही हात अवघे दीड फुटांपर्यंतच वाढले आहेत. हाताची उंची खुंटली तरी जिद्दीच्या जोरावर तबिशने करिअरचे स्वप्न मात्र पूर्ण या जिद्दीने भुजबळ नॉलेज सिटीत पदविका महाविद्यालयात शिकताना संगणक अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून अभियंता होण्याचे स्वप्न उरी बाळगले आहे. आपल्या छोट्याशा हातांनी संगणक चालवण्याची किमया लिलया पार पाडणार्‍या तबिशचा हा प्रवास इतरांना प्रेरणा देणारा आहे.

काही मुले जन्मत: दिव्यांग असली तरी प्रतिभेच्या जोरावर प्रत्येक गोष्ट साध्य करण्याचे धाडस त्यांच्याकडे असते. असाच एक विद्यार्थी म्हणजे तबिश शेख होय. नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटल परिसरात राहणारा हा मुलगा. जन्मत: त्याच्या हातांची उंची खुंटली आहे. अशा परिस्थितीत सर्व कामे स्वत: करण्याची जिद्द त्याला शांत बसू देत नव्हती. सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इयत्ता दहावीला 75.40 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्यानंतर तबिशचा आत्मविश्वास अधिक उंचावला. त्याने सन 2016 मध्ये डिप्लोमासाठी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे प्रवेश घेतला. शारीरिक व्यंग बघून विद्यार्थी त्याच्याकडे सहानुभूतीने बघत. परंतु, त्याला हे आवडत नाही. नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्याला गृहित धरावे, असाच त्याचा आग्रह राहिला आहे.

- Advertisement -

डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात ऑल क्लिअर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. मात्र, दुसर्‍या वर्षात गणित व इलेक्ट्रीकल या विषयांनी त्याला दगा दिला. मात्र, ‘उम्मिद पे दुनिया कायम है‘ या अपेक्षेने त्याला अद्याप हरवलेले नाही. अंतिम वर्षाच्या सर्व विषयांसह बँकलॉग राहिलेले दोन विषय कोणत्याही परिस्थितीत उत्तीर्ण होण्याची जिद्द त्याने ठेवली आहे. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत डिप्लोमा उत्तीर्ण होऊन पुढील वर्षी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचा त्याने निश्चय केला आहे. संगणकशास्त्राची विशेष आवड असलेल्या तबिशला ऑनलाईन गेम खेळण्यात व त्यातील त्रुटी शोधण्याची विशेष रुची आहे. तासन् तास गेम खेळून त्यातील असंख्य त्रुटी त्याने शोधून काढल्या आहेत. याच क्षेत्रात त्याला भविष्यात करिअर घडवण्याची इच्छा आहे.

तबिशचे वडील पॅथेलॉजिस्ट असून आई घरकाम करते. छोटा भाऊ रईस हा इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असून त्याचे सर्व त्याला शारीरिक व्यंग नसल्याचे तबिश सांगतो. घरात एकच व्यक्ती दिव्यांग म्हणून जन्माला आला आणि तो म्हणजे तबिश. छोट्याशा हातांनी हा काय करणार? अशी चिंता पालकांना वाटत होती. परंतु, त्याची जिद्द आणि चिकाटी बघून आई, वडिलांनादेखील त्याचा अभिमान वाटतोय.

- Advertisement -

भविष्यात अनेक गेम्स तयार करण्याची इच्छा

सायकल चालवणे, क्रिकेट, व्हॉलिबॉल खेळता येत नसल्याचे खूप दु:ख होत असे. त्याला पर्याय म्हणून संगणकावरील गेम्स खेळण्याचा छंद लागला. त्यामुळे संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा निश्चय केला आहे. भविष्यात अनेक गेम्स तयार करण्याची इच्छा आहे.
तबिश शेख, विद्यार्थी (मेट भुजबळ नॉलेज सिटी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -