घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'आपलं सरकार' केंद्रावर विद्यार्थी-पालकांची लुटमार; हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी

‘आपलं सरकार’ केंद्रावर विद्यार्थी-पालकांची लुटमार; हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी

Subscribe

नाशिक : आपलं सरकार केंद्राच्या माध्यमातून विविध शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालकांची आर्थिक लुटमार सुरू असून नागरिकांना तक्रारीसाठी प्रशासनाने हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी युवा अंकुर प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

महाविद्यालयीन प्रवेशाच्या पार्श्वभुमीवर प्रवेशासाठी आवश्यक दाखल्यांसाठी आपलं सरकार केंद्रामार्फत विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले दिले जातात. मात्र या काळात या केंद्र चालकांकडून अक्षरशः विद्यार्थी, पालकांकडून अतिरिक्त रक्कम वसुल केली जाते. मात्र याविरोधात दाद नेमकी मागायची कुठे असा प्रश्न नागरिकांना पडतो त्यामुळे केंद्र चालकांकडून होणार्‍या या पिळवणुकीविरोधात तक्रार करण्यासाठी प्रशासनाने हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. तसेच गेल्या आठ दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याने मोठया प्रमाणावर दाखले प्रलंबित आहेत.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता शैक्षणिक दाखले जमा करण्यासाठी ४ जुलै पर्यंतची मुदत आहे मात्र सर्व्हरच्या तांत्रिक समस्या अद्यापही सुटू न शकल्याने जर वेळेत दाखले मिळाले नाही तर प्रवेश रदद होण्याची भीती आहे. त्यामुळे दाखल केलेल्या अर्जाच्या पावतीवर प्रवेश प्रक्रिया पुर्ण करत विद्यार्थ्यांना दाखले जमा करण्यास मुदत देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी युवा अंकुर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अजिंक्य गिते, वैभव वाकचौर, ज्ञानेश्वर मोरे, महेश गायकवाड, स्वप्निल मोरे आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष

कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी बदलीच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे महसूली कामकाजात ते फारसे लक्ष देत नसल्याचेही दिसून येत आहे. म्हणूनच की काय, प्रशासनात कार्यरत झारीतील शुक्राचार्यांचेही फावले असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

केंद्रांना मोकळे रान

यापूर्वी निकालाआधीच केंद्र चालकांच्या बैठका घेत त्यांना कामकाजाबाबत सूचित केले जात होेते. तसेच या काळात पथकाची नियुक्ती करत केंद्र तपासणीही केली जात होती. मात्र, यंदा केंद्र चालकांना रान मोकळे करून देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे.

हेही वाचा : ‘आपलं सरकार’ केंद्रांकडून विद्यार्थी, पालकांची सर्रास लूट; मात्र, प्रशासनाचे संशयास्पद मौन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -