घरमहाराष्ट्रनाशिकगुंतवणुकीच्या दृष्टीने टाटा करणार नाशिकची पाहणी

गुंतवणुकीच्या दृष्टीने टाटा करणार नाशिकची पाहणी

Subscribe

भाजप उद्योग आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली रतन टाटांची भेट

खेळती हवा, मुबलक पाणी, तंत्रशिक्षणाशी संबंधित संस्थांची मांदियाळी आणि जागांची उपलब्धता ही नाशिकची बलस्थाने असून यामाध्यमातून येथे उद्योग विकासाला मोठी संधी आहे. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सादरीकरणावर प्रभावीत होऊन टाटा यांनी आपले तज्ज्ञांचे पथक नाशिकची पाहणी करण्यासाठी महिन्याभरात पाठवण्याची ग्वाही दिली. नाशिकमध्ये टाटा समूहाने उद्योग सुरू केल्यास बेरोजगारीच्या प्रश्नाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे बोलले जात आहे.

नाशिकची अर्थव्यवस्था शेती आणि वाहन उद्योगांवर अवलंबून आहे. डिझेलमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने भविष्यात डिझेलवर चालणार्‍या वाहनांची निर्मितीच बंद करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. या वाहनांचे रुपांतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये होणार आहे. ही रुपांतरणाची प्रक्रिया साधारणत: २०३० पर्यंत पूर्ण होऊ शकते. यात नाशिकमधील अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांवर संकट निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजप उद्योग आघाडीने रतन टाटा यांची मुंबईत भेट घेऊन नाशिकच्या बलस्थानांचे सादरीकरण केले. टाटा समूहाने नाशिकमध्ये गुंतवणूक करावी यासाठी शिष्टमंडळाने आग्रही भूमिका घेतली. मोठ्या उद्योगांसाठी शासन स्तरावर मोठी मदत देण्याची ग्वाही यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. टाटा समूहाच्या वतीने उद्योग उभारणीची पुढील दिशा ठरवण्यासाठी एक महिन्याच्या आत वरिष्ठ अधिकार्‍यांचे पथक नाशिकला भेट देईल, असे यावेळी रतन टाटा यांनी सांगितले. प्रदीप पेशकार यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात क्रेडाईचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण, सूर्या इंडस्ट्रीजचे संचालक आनंद सूर्यवंशी, युव्हीके लींकचे मुख्यकार्यकारी अधिकारी युवराज वडजे यांचा समावेश होता.

- Advertisement -

या तीन क्षेत्रांमध्ये होऊ शकते गुंतवणूक

संरक्षण आणि एअरोस्पेस, विजेवरील वाहनांची निर्मिती, विजेवरील वाहनांच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्येे गुंतवणूक करण्यासाठी नाशिकला अग्रक्रम देण्याचा विचार होईल, असे रतन टाटा यांनी आम्हाला सांगितले. -प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष भाजप उद्योग आघाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -