घरमहाराष्ट्रनाशिकशहरातून जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग होणार प्रकाशमान

शहरातून जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग होणार प्रकाशमान

Subscribe

नाशिक : शहरासह परिसरातील महामार्गावरील अपघातांचे आणि अंधारातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग प्रकाशमान व्हावेत, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोड प्रकाशमय करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली असून, विजेचे ९२४ पोल उभारण्यात येणार आहेत.

शासनाच्या या निर्णयामुळे आता महामार्ग प्रकाशमय होणार असून, रात्रीच्या अंधारात हकनाक होणारे अपघात टळणार असल्याचा विश्वास खासदार गोडसे यांनी व्यक्त केला आहे. नाशिक शहर परिसरातील आणि नाशिक – आग्रा महामार्गावर विजेचे पोल कमी व सतत बंद स्थितीत असल्याने महामार्गावर कायमच लहान, मोठे अपघात होत असतात. पावसाळ्यात अपघातांच्या प्रमाणात मोठया प्रमाणावर वाढ होते. या अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून, अनेकांच्या वाटयाला कायमचेच अपंगत्व आले आहे. अंधाराचा फायदा घेत लुटारूंकडून रस्त्यावरील प्रवाशांना लुटल्याच्या अनेक घटना घडतच असतात. ही विदारक परिस्थिती टाळण्यासाठी महामार्गावर प्रखर उजेड घेणार्‍या एलईडी असावेत, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे.

- Advertisement -

५० किलोमीटरमध्ये उभे राहणार ९२४ पोल

मुंबई-आग्रा महामार्ग, वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल फ्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोडवर विजेचे पथदिपे बसविण्यासाठी आणि त्याच्या देखभाल करण्यासाठी ८ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. नाशिक शहर परिसरातील मुंबई -आग्रा महामार्गाच्या 40 किलोमीटर अंतरावर दोनही बाजूच्या सर्व्हिसरोडसह ५४४, वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल या दरम्यानच्या दहा किलोमीटरच्या अंतरावर 322 तर कोकणगाव शिवारातील सुमारे पावणे दोन किलोमीटर अंतरावर 58, प्रखर उजेड देणारे एलईडी पथदिपे नव्याने बसविण्यात येणार आहेत. या निधीतूनच देखभालही करण्यात येणार आहेत. या निधीतून एकूण ५० किलोमीटर अंतरावर ९२४ विजेचे पोल उभारण्यात येणार आहेत. नव्याने उभारण्यात येणार्‍या विजेच्या पोलमुळे शहर आणि परिसरातील महामार्ग प्रकाशमय होणार असून, अपघातांचे प्रमाण अत्यल्प होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -