पंचमुखी हनुमान मंदिरात चोरी; ७0 किलोची दानपेटी फोडून नदीत फेकणार्‍यांना अटक

जुना आडगाव नाक्यावर असलेल्या प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरातून दानपेटीची चोरी करणार्‍या चौघांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या १० तासांत पंचवटी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चोरट्यांनी गोदावरी नदीपात्रात फेकून दिलेली ७० किलोची दानपेटी व २७ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. राज श्रावण बोडके (वय २०), राहुल राजन सहाणे (२१), निलेश श्रीपाद उफाळे (१८), गणेश सुरेश काळे (२२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तपोवन परिसरातील प्राचीन बटुक हनुमान मंदिरात काही दिवसांपूर्वी देव्हार्‍यातील चांदी व सोन्याच्या मूर्तींची चोरी घडल्याची घटना घडली होती. त्यानंतर रविवारी (दि.१५) पहाटे ४ वाजता पंचवटीतील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात दानपेटीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार केला जात असल्याने बांधकाम सुरू असल्यामुळे येथील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात आले आहेत. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी पंचमुखी हनुमान मंदिरातील दानपेटी चोरून नेली. रविवारी मंदिर प्रमुख महंत भक्तीचरणदास महाराज यांनी घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या घटनेतील संशयित चौघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता चौघांनी दानपेटी फोडून रिकामी दानपेटी रामवाडी पुलावरुन गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातून दानपेटी बाहेर काढून जप्त केली. दरम्यान, मंदिर बांधकाम सुरू असल्याने आणि कोरोना नियमांमुळे गेल्या तीन चार महिन्यांपासून दानपेटी मंदिर व्यवस्थापनाकडून खोलण्यात आली नसल्याची माहिती महंत भक्तीचरणदास महाराज यांनी सांगितले.