शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण नाही:छगन भुजबळ

भुजबळांचा पडळकरांना सवाल

नाशिक : शरद पवार साहेबांची कोणाला अ‍ॅलर्जी असण्याचे कारण नाही. त्यांच्या मताला आणि अनुभवाला किंमत आहे, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी गोपीळचंद पडळकरांना उत्तर दिले. एसटी कर्मचार्‍यांच्या संपावरून पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परबांना शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, असा सल्ला दिलाय. खरे तर दोन महिन्यांपासून जास्त चाललेला एसटी कर्मचार्‍यांचा संप सोडवण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुढाकार घेतला. त्यांच्या विनंतीला मान देत अनेक संघटनांनी या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यावरून पडळकर आक्रमक झाले आहेत.

पडळकरांच्या वक्तव्याचा भुजबळ यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. भुजबळ म्हणाले, शरद पवारांची अ‍ॅलर्जी कुणालाच असल्याचं कारण नाहीये. कारण आज महाराष्ट्रातील नाही तर देशातील असे नेते आहेत त्यांच्या मताला, अनुभवाला किंमत आहे. राज्यात जेव्हा प्रश्न सुटत नाही तेव्हा महाविकास आघाडीतील एक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे.

गिरणी कामगारांचा संप अजूनही संपल्याचे कुणीच जाहीर केलेले नाही. एसटी संपाबाबत इतका अट्टहास करणं योग्य नाही. कामगारांना समजावून सांगणे हा परवारांचा हक्क आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मार्गदर्शन करण्याचे शरद पवारांचे काम आहे. त्यामध्ये अ‍ॅलर्जी असण्याचे इतरांना कारण नाही. महाविकास आघाडी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न करेल असे ते म्हणाले.