घरमहाराष्ट्रनाशिकट्रॅकमन बनले देवदूत!

ट्रॅकमन बनले देवदूत!

Subscribe

रेल्वेतून पडलेल्या तरुणाला चिखलातून खांद्यावर नेत रुग्णालयात पोहोचवले; ‘जाम बावटा’चेे केले ‘स्ट्रेचर’; अस्वली स्टेशन परिसरातील घटना

अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी धडपडणारे हात हल्ली कमीच दिसून येतात. त्यात जखमीला जीवनदान देणे शक्यच नसेल तर अनेकांकडून बघ्याची भूमिकाच घेतली जाते. फोटो काढणे, व्हीडियो बनवणे, इतरांना फोन करून मदतीसाठी सांगणे असेच प्रकार अनेकदा ऐकिवात असतात. मात्र, रेल्वेतून पडलेल्या गंभीर जखमीला जीवनदान देत रेल्वे कर्मचार्‍यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. ट्रॅकची पाहणी करताना आढळलेल्या या तरुणाला वेळीच उपचाराची गरज असल्याचे लक्षात घेऊन कर्मचार्‍यांनी कुठलीही सुविधा नसताना आपल्या हातातील ‘जाम बावटा’ या झेंड्यालाच स्ट्रेचर बनवत आणि प्रसंगी खांद्यावर उचलून घेत तब्बल दीड किलोमीटर अंतर चिखलातून पायी कापत या तरुणास रुग्णालयात पोहोचवले.

पुश ट्रॉलीतून मंगळवारी दुपारच्या सुमारास रेल्वे अधिकारी सचिन आहेर, ट्रॅकमन संदीप सांगळे, प्रमोद डांगे, विठ्ठल दराडे, संजय सदगीर, सागर झोले, विशाल वाजे हे घोटी ते अस्वली दरम्यान रेल्वे रुळाची पाहणी करत होते. त्यांना किलोमीटर १५८/१७ ते १९ दरम्यान एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. कडक उन्हात तो बेशुद्ध होता. त्याचा श्वासोश्वास सुरू असल्याचे लक्षात घेऊन कनिष्ठ अभियंता सचिन आहेर यांनी स्टेशन मास्तरला तत्काळ फोन केला. अप किंवा डाऊन लाईनवर अजून एक ते दीड तास कोणतीच रेल्वे येणार नसल्याची माहिती समजली. तोपर्यंत इतर कर्मचार्‍यांनी घटनेच्या जागेपासून ट्रॅकवर पहाणी केली असता, जखमीच्या खिशातील कागदपत्र सापडले, यात सापडलेल्या आधारकार्डवर आरिफ खान (जोलाहनपुरा, जि. नरहरगोंडा, उत्तर प्रदेश) असा उल्लेख आढळला. गंभीर जखमा असल्याने त्याला त्वरित उपचार आवश्यक होते. मात्र, रुग्णालय जानोरी गावात. त्याचे अंतर तब्बल दीड किलोमीटर. पाऊस, चिखल शेती परिसर यामुळे वाहनाची सुविधाच नाही. अशा स्थितीत कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान दाखवत रेल्वे थांबविण्यासाठी वापरण्यात येणारा ‘जाम बावटा’ या झेंड्याचे स्ट्रेचर केले आणि जखमीला उचलून चिखलाच्या भातशेतातून मार्गक्रमण सुरू केले. यानंतर पाडळी युनिट नंबर 3 अप लाईनचे कर्मचारीही मदतीला आले. त्यांनी लागलीच १०८ क्रमांकावर संपर्क साधून तत्काळ उपलब्ध होण्यासाठी आर्जव केले. रुग्णवाहिका नाहीच उपलब्ध झाली, तर घोटी येथून खासगी वाहनांची व्यवस्थाही त्यांनी याच धावपळीत केली. हे सर्व अधिकारी, कर्मचारी जखमीला घेऊन अर्ध्या तासानंतर पाडळी येथे येऊन थांबलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सपर्यंत पोहचले. तेथून जखमीला जानोरीतील रुग्णालयात पोहोचवण्यात आले. एवढेच नव्हे, तर ट्रॅकमेन व अधिकार्‍यांनी जखमीला सायंकाळी रुग्णालयात भेटून प्रकृतीबाबत विचारणाही केली. बुधवारी सकाळी मुंबई येथून जखमीचे नातेवाईक आले असता त्यांनी कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल आभार मानले.

- Advertisement -

प्राण वाचवू शकल्याचे समाधान

पुश ट्रॉलीने आम्ही डाऊन लाईनवरून येत असताना हा जखमी ट्रॅकवर दिसला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी कुठलाच पर्याय नसल्याचे पाहून रेल्वे थांबविण्यासाठी वापरला जाणार्‍या झेंड्याचे स्ट्रेचर बनवून आम्ही चिखलवाटेतून त्याला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. काही ठिकाणी चौघांना चालणे कठीण असल्याने मी स्वःता बरेच अंतर खाद्यावर या रुग्णाला नेले. त्याचा जीव वाचला यातच मोठे समाधान आहे. – संदीप सांगळे, ट्रॅकमन, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -