‘सिव्हिल’मध्ये सोनोग्राफी मशीनचा विनापरवानगी डेमो; कायदेभंग करत तीन सोनोग्राफी, नऊ टूडी मशीन खरेदी

नाशिक : अनधिकृत गर्भलिंगनिदान चाचण्यांना आळा घालण्यासाठी सोनोग्राफी मशीनचा डेमो करायलादेखील महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असते. असे असतानाही जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि.२३) सोनोग्राफी मशीनचा विनापरवानगी डेमो घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयानेच कायदेभंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा रुग्णालयासाठी तीन सोनोग्राफी, नऊ टुडी इको मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्यांनी निविदा भरल्या त्या ठेकेदारांना जिल्हा रुग्णालयाने गुरुवारी (दि.२३) निमंत्रित केले होते. या ठेकेदारांकडून सोनोग्राफी आणि टुडी इको मशीनचे प्रात्यक्षिक घेतले गेले. गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार सोनोग्राफी आणि टुडी इको मशीनचा डेमो जरी द्यायचा असेल तरी पालिकेची लेखी परवानगी आवश्यक असते. प्रत्यक्षात गुरुवारी जो डेमो झाला त्याची परवानगीच घेण्यात आली नाही. सिव्हिलने परवानगीसाठी पत्रव्यवहार केला असला तरीही परवानगी मिळाली किंवा नाही, हे न पाहताच सिव्हिलने परस्पर सोनोग्राफी डेमो केला.

जिल्हा रुग्णालयाने ज्या ठेकेदारांना यासाठी निमंत्रित केले. त्यांच्याकडेही गर्भलिंगनिदान प्रतिबंध विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. प्रत्यक्षात आलेल्या काही ठेकेदारांकडे असे प्रमाणपत्र आहे की नाही याविषयीदेखील साशंकता आहे. जिल्हा रुग्णालयाने शहानिशा करूनच संबंधित ठेकेदारांना बोलवणे गरजेचे असते. मात्र, या प्रकरणात तसे झालेले दिसत नाही.

मशीनचा दुरुपयोग होणार नाही याची काय शाश्वती?

सदर सोनोग्राफी मशीन हे इतर जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचे माहितीतून कळते. अशाप्रकारे बाहेरून मागवण्यात आलेल्या विनापरवानगी सोनोग्राफी मशीनचा दुरुपयोग होणार नाही याबाबत सिव्हिल प्रशासन तरी शाश्वती घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोनोग्राफी व टू डी इको मशीनचा डेमो खासगी हॉस्पिटल्स किंवा सिव्हिल हॉस्पिटल येथे करायचा असेल तर त्यापूर्वी पालिकेच्या वैद्यकीय विभागाची परवानगी मिळणे आवश्यक असते. मात्र, गुरुवारी जो डेमो सिव्हिलमध्ये झाला त्याची महापालिकेकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. : बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय विभाग प्रमुख महापालिका

जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीनचा डेमो करण्याबाबत नाशिक महापालिकेकडे परवानगी मिळणेबाबत पत्रव्यवहार केला आहे. : डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल