घरमहाराष्ट्रनाशिकखासदार निधीला मंजुरी मिळूनही रुग्णवाहिकेची प्रतीक्षा

खासदार निधीला मंजुरी मिळूनही रुग्णवाहिकेची प्रतीक्षा

Subscribe

साल्हेर ग्रामस्थांचा संतप्त सवाल

सटाणा : बागलाण पश्चिम पट्ट्यातील साल्हेर ग्रामपंचायतीला चार वर्षांपूर्वी खासदार सुभाष भामरे यांच्या आदिवासी कोट्यातून रुग्णवाहिकेसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, चार वर्षे उलटूनही आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट खासदार भामरे यांच्याकडे याबाबत कैफीयत मांडत रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

चार वर्षांपूर्वी खासदार भामरे यांच्या निधीचे पत्र साल्हेर ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. या पत्राचा पाठपुरावा ग्रामसेवक गणेश जाधव यांनी केला. मात्र, तरीही सरकारी विलंबामुळे रुग्णवाहिका मिळू शकली नाही. साल्हेर ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका मिळावी म्हणून गेल्या दोन महिन्यांपूर्वी साल्हेर ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात खासदार सुभाष भामरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी खासदार भामरे यांनी शिष्टमंडळासमोरच संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलावून विलंबाबाबत विचारणा केली. तेव्हा अधिकार्‍यांनी या विलंबामागील कारण स्पष्ट केले.

- Advertisement -

खासदार भामरे यांनी जेव्हा पत्र दिले तेव्हा आणि आता अ‍ॅम्ब्युलन्सच्या किंमतीत मोठी तफावत निर्माण झाली आहे. या वाढीव किंमतीमुळे निधीची अडचण येत असल्याचे अधिकार्‍याने सांगितले. त्यावर खासदार भामरे यांनी, रुग्णवाहिका घेण्यासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल. तुम्ही तत्काळ कागदपत्राची पूर्तता करा, अशी सूचना केली होती. या भेटीनंतर साल्हेर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे ग्रामसेवक गणेश जाधव यांनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली. जेणेकरुन अ‍ॅम्ब्युलन्स लवकरात लवकर मिळेल. मात्र, अद्यापही खासदार निधीतून मंजूर असलेली रुग्णवाहिका मिळालेली नाही. या प्रकारामुळे अधिकार्‍यांची बेपर्वाई आणि सरकारी कामकाजातला विलंब पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे ग्रामस्थ मात्र चांगलेच संतप्त झाले आहेत.

सरकारी विलंबामुळे वाढली किंमत

खासदार सुभाष भामरे यांचे निकटवर्तीय तथा बागलाण तालुक्याचे कामकाज पाहणारे डॉ. शेषराव पाटील यांच्याशी ग्रामस्थ प्रतिनिधींनी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी नाशिक येथे येऊन भेटण्यास सांगितले होते. त्यानंतर खासदार व ग्रामपंचायत शिष्टमंडळाची भेट झाली. अधिकार्‍यांकडे पाठपुरावा न झाल्यामुळे आणि आता रुग्णवाहिकेची किंमत वाढल्याने रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याची बाब पुढे आली. कागदपत्रांमध्ये रखडलेल्या रुग्णवाहिकेसाठी ग्रामसेवकाने पाठपुरावा करणे अपेक्षित होते. ही बाब निदर्शनास आल्यावर डॉ. शेषराव पाटील शिष्टमंडळावरच भडकले. किरकोळ कामासाठी उगाच फोन करता, असे सांगत त्यांनी विषय बाजूला ठेवला.

खासदार सुभाष भामरे यांच्या आदिवासी निधीतून साल्हेर ग्रामपंचायतीसाठी गेल्या चार वर्षापासून रुग्णवाहिका मंजूर आहे. मात्र, आम्ही पाठपुरावा करून थकलो तरीही रुग्णवाहिका मिळालेली नाही. त्यामुळे खासदार सुभाष भामरे यांनी लक्ष घालून साल्हेर ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका मिळवून द्यावी.
– राणी भोये, सरपंच, साल्हेर

साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सात आदिवासी पाडे येतात. त्यात साल्हेर, बंधारपाडा, पायरपाडा, भिकारसौडा, महादर, मोठे महादर, भाटाबा या गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका जुनाट झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, जागतिक आरोग्य दिनी जिल्हा परिषदेमार्फत साल्हेर आरोग्य केंद्रास नवी रुग्णवाहिका मिळाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला.
– डॉ. अमोल पाठक, वैद्यकीय अधिकारी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -