विकेंडला लग्न सोहळ्यांना परवानगी द्या

मंगल कार्यालय असोसिएशनचे पालकमंत्र्यांना निवेदन

wedding hall

विवाह सोहळ्यांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊनमुळे विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यास परवानगी नाही. मात्र, याच काळात विवाहाचे मुहूर्त असल्याने कार्यालय चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शनिवार, रविवार या दिवशी लग्न सोहळ्यांना परवानगी मिळावी अशी मागणी नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स, हॉल असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

लग्न सोहळ्यांमधून होणार्‍या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याने मंगल कार्यालयात आयोजित केल्या जाणार्‍या विवाह सोहळ्यांवर निर्बंध आणण्यात आले. ऐन लग्नसराईच्या काळात कार्यालय चालकांना बूकिंग रद्द कराव्या लागल्याने मोठे नुकसान झाले. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली असून सोमवार ते शुक्रवार या दरम्यान ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. १६ जून ते १३ जुलै दरम्यान केवळ १० विवाह मुर्हूत आहेत. त्यातील चार मुहूर्त हे शनिवार आणि रविवारचे आहेत. शक्यतो शनिवार, रविवारी विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याकडे आयोजकांचा कल असतो. पुढील शुभकार्य हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. त्यामुळे चार मुहूर्तांसाठी तरी शनिवार आणि रविवार दोन दिवस लग्न सोहळ्यांना परवानगी देण्याची मागणी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे करण्यात आली.यावेळी अध्यक्ष सुनिल चोपडा, संदीप काकड, शंकरराव पिंगळे, समाधान जेजुरकर, प्रवीण कमले आदी उपस्थित होते.

जून, जुलै या दोन महिन्यांत केवळ दहा शुभ मुर्हूत आहेत. त्यातील केवळ चार मुर्हूत हे शनिवार आणि रविवारी येतात. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत शुभकार्य नाही. पुढील १५० दिवसांत केवळ १२ ते १४ दिवस लग्नकार्य चालणार आहे. अन्य दिवशी कार्यालये बंदच राहतील. त्यामुळे प्रशासनाने शनिवार, रविवार या दिवशी लग्नकार्यास परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे.
                – समाधान जेजूरकर, सेक्रेटरी, मंगल कार्यालय असोसिएशन