राजकीय अस्थिरतेमुळे आदर्श कुणाचा घ्यायचा ?

साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचे मत

नाशिक : राज्यभरात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिर वातावरण हे काळजी करण्यासारखे आहे. पूर्वी राजकर्त्यांचे राजकारण हे आदर्शवादी असायचे मात्र, आजचे राजकारण अनिश्चित आहे. त्यामुळे भावी पिढीने जीवन कसे जगायचे, त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, राज्य व देशात महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीचे प्रश्न सोडवणे गरजेचे असताना राजकीय अस्थिरतेमुळे सर्वत्र अविश्वासाचे वातावरण आहे. हे सर्व थांबले पाहिजे, अशा शब्दांत साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी दै. आपलं महानगर’शी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

संवेदनशील कलावंत म्हणून राजकीय अस्थिरमुळे त्रास होत आहे. राजकीय अस्थिरतेचे वातावरण फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आहे. राजकीय अस्थिरतेमुळे सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा मरगळ येईल. कोरोनाकाळात वृद्ध कलावंतांसह विविध प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. राज्यात पुन्हा नवीन सरकार आले तर परत नवीन सांस्कृतिक मंत्री येईल. आधीच्या शासनाच्या अधिसूचनेत बदल केले जातील.

त्यामुळे प्रलंबित कामे आणखी प्रलंबित राहतील, अशी काळजीही सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी बोलून दाखवली. राज्यातील राजकीय अस्थिर वातावरण हे सिंहासन चित्रपटाप्रमाणे झाले आहे. आताचे व आधीचे राजकारण खूप बदलले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजकारण हे आदर्शवादी होते. तर, आजचे राजकारण विश्वासघातकी आहे. कोणाचा कोणावर विश्वास नाही, हे समाजासाठी घातक आहे. प्रत्येक क्षेत्रात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या राजकीय अस्थिर वातावरणाचा सुज्ञ नागरिक, कलावंत व मतदारांनी गांभीर्याने विचार करावा, असेही मान्यवरांनी सांगितले.

राजकीय अस्थिर वातावरणामुळे राज्य नेमके कोणत्या दिशेने चालले आहे याबाबत सर्वांनाच प्रश्न आहे. खरे म्हणजे कोरोनासारख्या संकटातून बाहेर पडत असताना महागाई, इंधनवाढ, बेरोजगारीचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. यास सांस्कृतिक क्षेत्रसुद्धा अपवाद नाही. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आदर्शवादी नेते होते. पण, आजच्या राजकारणात आदर्श नेमका कोणाचा घ्यावा, हा प्रश्न आहे.
– प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखा

राजकीय अस्थिरतेमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रलंबित राहत आहेत. राज्यात शेतकरी मेटाकुटीला आला असून, त्यांच्यासाठी राज्य सरकारने मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय स्थिरता झाली पाहिजे. – अ‍ॅड. भानुदास शौचे, सावाना

सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याऐवजी राज्यात जो खुर्चीचा खेळ सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. सर्वसामान्य नागरिक आधीच कोरोना संकटातून कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करत असताना सरकारने लोकहिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे. नागरी प्रश्नांची सोडवणूक व्हावी, राज्यात उद्योग-धंदे वाढावेत, रोजगार निर्माण व्हावा, यासाठी जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते. मात्र, अशा रितीने राजकारण सुरू राहिल्यास नागरिक मतदान तरी का करतील, हा प्रश्न आहे.
– गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

राजकीय अस्थिरतेमुळे नागरिकांची प्रशासकीय कार्यालयांमधील सर्व कामे ठप्प झाली आहेत. राज्यकर्त्यांनी नागरिकांना वेठीस धरू नये. यावर लवकर तोडगा निघाला पाहिजे.
– अ‍ॅड. अभिजित बगदे, सावाना

ज्या विश्वासाने आपण आमदार, खासदार निवडून देतो त्यांच्याकडून लोकहिताची कामे होणे गरजेचे आहे. पण आज प्रत्येक व्यक्ती आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, जनता समजदार आहे. राज्यातील जनता हे सर्व पाहत आहे. आज कायद्याने याबाबत निर्णय घेतला गेला तरी भविष्यात या नेत्यांचे भविष्य सर्वसामान्यांच्याच हाती असेल. त्यामुळे राजकारण्यांनी जनतेला गृहीत धरू नये.
– चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

सरकार कोणतेही असो सर्वसामान्य नागरिकांना काही फरक पडत नाही. त्यांचे प्रश्न कोणत्याच सरकारने सोडवलेले नाहीत. राजकीय अस्थिरता ही सत्तेसाठी सुरू आहे. नागरिकांनी मतदानातून लोकप्रतिनिधींना उत्तर द्यावे. – प्रा. दिलीप फडके, अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय नाशिक

सरकार येणार-जाणार, राजकारणात हे सुरूच असते. परंतु, आजचे अस्थिर वातावरण चिंताजनक आहे. राजकीय अस्थिरतेमुळे नागरिकांची नाहक होरपळ होत आहे. प्रत्येक सरकारमध्ये कलावंतांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला. परंतु, न्याय मिळाला नाही. या अस्थिरतेमुळे कलावंतांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत.  – सुनील ढगे, कार्याध्यक्ष, नाट्य परिषद

मतदार विविध पक्षांना विश्वासाने निवडून देतात. मात्र, पक्ष फक्त स्वत:चा विचार करतात. पूर्वी पक्ष समाजासाठी असल्याचे कामांवरुन दिसून यायचे. आता पक्ष, लोकप्रतिनिधी आमच्या आणि माझ्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहेत. इंधनाचे दर वाढले असून, ते कमी झाले पाहिजेत. यावर लोकप्रतिनिधी काहीही करताना दिसत नाही. राजकीय अस्थिरतेवर तोडगा निघाला पाहिजे.
– सुहास भोसले, दिग्दर्शक